(फोटो सौजन्य: istock)
मधुमेह हा सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे, आता तर हा आजार लहानांनाही जडू लागला आहे. ही आरोग्य समस्या आहे, जी शरीरातील इन्सुलिन हार्मोनच्या असंतुलनामुळे उद्भवते. हा एक असा आजार आहे ज्यावर कोणताही उपाय नाही. एकदा हा आजार तुम्हाला जडला तर आयुष्यभर तुम्हाला यापासून सुटका नाही. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू लागते, जे नियंत्रणात ठेवण्यासाठी लोकांना फार परिश्रम घ्यावे लागतात.
मधुमेहाचा शरीरावर हळूहळू परिणाम होतो आणि त्याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात खूपच सौम्य असतात. तथापि, या आजाराची काही अशीही लक्षणे आहेत जी शारीरिक हालचालींदरम्यान स्पष्टपणे दिसतात. या लक्षणांना मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही दुर्लक्षित करू नये. आज आपण या लेखात डायबिटीजच्या अशाच काही सौम्य लक्षणांविषयी जाणून घेणार आहोत जे शरीरावर परिणाम करत असतात. या लक्षणांना वेळीच ओळखून तुम्ही यावर उपाययोजना करू शकता.
Health Tips: हाय ब्लड शुगरला कमी करतात ‘या’ हिरव्या भाज्या, मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
मधुमेही रुग्णांमध्ये थकवा आणि अशक्तपणा हे एक सामान्य लक्षण आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त असते तेव्हा शरीरातील पेशी ऊर्जेसाठी ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाहीत. यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि व्यक्तीला थकल्यासारखे वाटू लागते. चालताना हा थकवा आणखी वाढतो, कारण शारीरिक हालचाली करताना उर्जेची जास्त गरज असते. थोडे अंतर चालल्यानंतरही अचानक थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते.
पाय दुखणे किंवा सुन्न होणे
मधुमेहामुळे मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असे म्हटले जाते. या स्थितीत, पाय दुखणे, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा अशा समस्या जाणवू शकतात. पायांवर दाब पडत असल्याने चालताना ही समस्या अधिकच वाढते. चालताना तुमच्या पायांमध्ये असामान्य वेदना किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास, हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत त्वरित रुग्णालय गाठा आणि यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महागडे गिफ्ट्सच नाही तर ‘या’ सोप्या गोष्टींनीही बायकोला करता येईल खुश, नात्यातील प्रेम आणखीन वाढेल
श्वास लागणे
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाची समस्या बहुतेकदा दिसून येते. जेव्हा एखादी व्यक्ती चालते किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करते तेव्हा ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवू लागते. असे घडते कारण मधुमेहामुळे हृदय आणि फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव पडतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. थोडं अंतर चालल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर सावध व्हा, कारण ते मधुमेहाचे लक्षण असू शकते.
पायांना सूज येणे
मधुमेहामुळे ब्लड सर्कुलेशनवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पायांना सूज येते. चालताना ही सूज वाढू शकते, ज्यामुळे पायांवर दबाव येतो. याव्यतिरिक्त, मधुमेहामुळे किडनी फंक्शनिंगवरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शरीरात लिक्विड जमा होऊ लागते आणि सूज येण्याची समस्या वाढते. जर तुमच्या पायांना कोणतीही दुखापत न होता सूज येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते.
आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर, आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार वेळीच ओळखून योग्य उपचार घेतल्यास गंभीर समस्या टाळता येते. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायाम करून मधुमेहाचा आजार नियंत्रणात ठेवता येतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.