
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पचनाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. गॅस, अपचन, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात जळजळ अशा तक्रारी आता केवळ वयोवृद्धांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर तरुणांमध्येही या समस्या सामान्य झाल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, अनियमित आहार, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि असंतुलित जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मात्र, काही योग्य सवयी अंगीकारल्यास पचनसंस्थेच्या अनेक तक्रारी टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. यासंदर्भात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) डॉ. शुभाशीष मजुमदार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
डॉ. मजुमदार यांच्या मते, पचनसंस्था केवळ अन्न पचवण्यापुरती मर्यादित नसून, ती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, ऊर्जा पातळी आणि मानसिक आरोग्याशीही थेट संबंधित असते. सतत जंक फूड, अतिमसालेदार, तिखट किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आतड्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामी शरीरात सूज वाढते आणि हळूहळू विविध पचनविकार उद्भवू शकतात.
चांगल्या पचनासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या आहारात फायबर, प्रोटीन आणि चांगल्या चरबीचे योग्य प्रमाण असावे, असे डॉक्टर सांगतात. साबूत धान्ये, फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये तसेच दहीसारखे प्रोबायोटिक पदार्थ आतड्यांसाठी फायदेशीर ठरतात. फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून संरक्षण मिळते आणि आतड्यांची स्वच्छता राखण्यास मदत होते. याउलट, जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड आणि गोड पेये पचनसंस्थेचे नुकसान करू शकतात. फक्त काय खातो यापेक्षा कसे आणि केव्हा खातो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. घाईघाईने जेवणे, उशिरा रात्री जड जेवण करणे किंवा दीर्घकाळ उपाशी राहणे यामुळे पचनावर विपरीत परिणाम होतो. अन्न नीट चावून, शांत मनाने आणि ठरावीक वेळेला खाल्ल्यास पचनक्रिया अधिक सुरळीत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जीवनशैलीतील छोटे बदलही पचन आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम करू शकतात. नियमित चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल योग्य राहते. तसेच पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण हेदेखील पचनविकार टाळण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. दीर्घकाळ तणावात राहिल्यास अॅसिडिटी, गॅस आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोमसारख्या समस्या वाढू शकतात. पाणी पिण्याची सवयही तितकीच महत्त्वाची आहे. पुरेसे पाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय राहते आणि बद्धकोष्ठतेपासून बचाव होतो. यासोबतच धूम्रपान आणि अतिमद्यपान पचनसंस्थेसाठी घातक असल्याने या सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टर देतात. एकूणच, योग्य आहार, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकारात्मक सवयी अंगीकारल्यास पचनाशी संबंधित अनेक समस्या सहज टाळता येऊ शकतात. पचनसंस्था निरोगी राहिली तर संपूर्ण शरीर निरोगी राहते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.