
मुंबईतील भायखळा स्थित ग्रँट सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. रुग्णालय, येथे प्रथमच सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण यश म्हणून अधोरेखित करण्यात आले आहे.
४० वर्षीय रुग्णाला मानेतील डिस्क हर्निएशनमुळे स्पायनल कॉर्डवर दाब येऊन सर्व्हायकल मायलोपॅथी झाली होती. या आजारामुळे मानेमध्ये वेदना, हात-पायांमध्ये मुंग्या किंवा कमजोरी तसेच चालताना अडचणी यांसारखी लक्षणे निर्माण झाली होती,अनेक दिवसांपासून सदर रुग्ण या आजाराने त्रस्त होता. विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल झाल्यानंतर प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने जे. जे रुग्णालयात उपचारासाठी सुचविण्यात आले. जे.जे मध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णाची तपासणी करून विविध चाचण्या केल्यानंतर त्याच्यासाठी सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंटचा निर्णय घेण्यात आला.
“सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच हिप किंवा गुडघ्याचे जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आता सर्वसाधारणपणे केल्या जातात. मात्र, मानेच्या मणक्यातील खराब झालेली डिस्क काढून तिच्या जागी कृत्रिम डिस्क बसवण्याची ‘सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट’ ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया सर जे. जे. रुग्णालयात प्रथमच यशस्वीपणे करण्यात आली आहे.” सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंटमध्ये खराब झालेल्या डिस्कच्या जागी विशेष कृत्रिम डिस्क बसवली जाते. यामुळे स्पायनल कॉर्डवरील दाब कमी करण्यासोबतच मानेची हालचाल टिकवून ठेवण्यास मदत होणे शक्य होते.
ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, वैदयकीय अधीक्षक डॉ. संजय सुरसे, ऑर्थोपेडिक्स विभागप्रमुख डॉ. नादिर शाह या वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्पाईन सर्जन डॉ. कुशाल गोहिल यांनी केली. तसेच या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. उषा बाडोले आणि डॉ. प्रेरणा जोगदंड यांच्या नेतृत्वाखालील अॅनेस्थेशिया टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.
शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती चांगली असून त्याला वेदनांमध्ये लक्षणीय आराम मिळाला असून रुग्ण आणि त्याचे नातेवाईक उपचारामुळे समाधानी असून रुग्णाच्या पुढील प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी कृत्रिम डिस्क अत्यंत महागडी असून, खाजगी रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी काही लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. मात्र, जे. जे. रुग्णालयात ही अत्याधुनिक शस्त्रक्रियेला विनामूल्य करण्यात आली असून त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णालाही प्रगत उपचार उपलब्ध झाले आहेत.
स्पाईन सर्जन डॉ. कुशाल गोहिल म्हणाले,”अत्याधुनिक स्पाईन सर्जरी ही केवळ मोठ्या खर्चाच्या खासगी रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य रुग्णांनाही उपलब्ध व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. जे. जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया विनामूल्य करता आली आणि रुग्णाला चांगला आराम मिळाला, हेच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.” जे. जे. रुग्णालयातील हे यश सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक स्पाईन सर्जरीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महत्वाचे मानलं जात आहे.