हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदू राजा अशी जरी शिवाजी महाराजांची ओळख असली तरी शिवरायांनी कधी धर्मभेद केला नव्हता. स्वराज्यात जसे हिंदू सैन्य होतं तसेच मुस्लीम अधिकारी देखील होते. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकात असे नमुद केवले आहे की, शिवकलातील होणाऱ्या लढाया धर्मनिष्ठा म्हणून नव्हे तर स्वामीनिष्ठा म्हणून होत होत्या. मुघल सैन्यात देखील मराठे होते आणि स्वराज्यात देखील मुस्लीम सैनिक होते. तेव्हा धर्मासाठी नाही तर राजावर असलेल्या निष्ठेपोटी लढाई व्हायची. यावर आधारित नुकत्याच खालीद का शिवाजी या मराठी सिनेमाचा ट्रेलर आला आहे. याचाच आधार घेत जाणून घेऊयात स्वराज्यात मातब्बर मुस्लीम सरदारांविषयी.
सिद्दी इब्राहिम हे शिवाजी महाराजांच्या विश्वासू आणि धाडसी सरदारांपैकी एक होते.पन्हाळगडातून सुटका करताना त्यांनी मोगल सैन्याशी त्यांनी मुकाबला केला होता. शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते महाराजांप्रती निष्ठावान राहिले होते.
शिवरायांचा वरिल काझी हैदर हे स्वराज्याप्रति आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रति निष्ठावान होते. स्वराज्यवाढीस त्यांचा देखील मोलाचा हातभार होता.
सिद्दी हलाल हे एक नावाजलेले तोफगोळ्यांचे (तोफखाना) तज्ञ होते. महाराजांच्या तोफखान्याचे ते प्रमुख होते. महाराजांनी बहुतांश तोफखान्याचे व्यवस्थापन अनेकदा मुस्लिम योद्ध्यांकडे दिले, कारण त्यांचा त्या क्षेत्रात अनुभव होता. सिद्दी हलाल यांनी शिवरायांचा विश्वास सार्थ कायमच ठरविला.
दर्या सारंग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलातील एक अत्यंत शूर आणि विश्वासू सरनौक (नौसेना प्रमुख) होते. त्यांच्या नावामध्येच त्यांची ओळख दडलेली आहे – “दर्या” म्हणजे समुद्र आणि “सारंग” म्हणजे कर्णधार म्हणून त्यांना दर्या सारंग अशी पदवी बहाल केली होती. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचे प्रमुख सरनौक म्हणून दर्या सारंग कार्यरत होते. त्यांनी कोकण किनाऱ्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.दर्या सारंग यांनी परकीय (पुर्तगाली, इंग्रज, सिद्दी) जहाजांशी युद्ध करताना अनेकदा विजय मिळवला. त्यांनी समुद्रमार्गाने शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवून अनेक यशस्वी सागरी मोहिमा पार पाडल्या.शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमारामुळे मराठ्यांना एक सशक्त सागरी ताकद मिळाली. त्यामध्ये दर्या सारंग यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते.
शिवरायांच्या निष्ठावान सैनिकांपैकी एक म्हणजे मदारी मेहतर. शिवरायांच्या आग्राच्या सुटकेसाठी जिवाची बाजी मदारी मेहतर या मुस्लीम सेवकाने लावली होती. महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी मदरी मेहतर यांनी मदत केली होती.