
फोटो सौजन्य: Freepik
आपल्या अनेकांच्या सकाळची सुरुवातच ही चहा चपाती किंवा फोडणीचा भात खाऊन होत असते. पाहायला गेलं तर चपाती आणि भात हे दोन्ही पदार्थ भारतीय जेवणातील मुख्य पदार्थ आहे. दोन्ही पदार्थांचे आपापले फायदे आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर मानले जातात.
हल्ली डाएटचे फॅड खूप वाढत आहे. लोकं ठराविक पदार्थ एक विशिष्ट वेळेत खाताना दिसत आहे. यामुळेच भात आणि चपाती खाण्याच्या वेळेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. काही लोक रात्री भात खाणे योग्य मानतात तर काही लोक रात्रीच्या जेवणात फक्त चपाती खातात. आज आपण जाणून घेऊया, भात आणि चपाती मध्ये कुठला पदार्थ रात्रीच्या जेवणात खाणे योग्य आहे.
चपातीत मुबलक प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते. चपाती खाल्ल्याने पोट लवकर भरते, ज्यामुळे ओव्हरइटिंगची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त चपातीत प्रोटिन्स सुद्धा जास्त प्रमाणात असतात.
चपातीत असणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम आपल्या रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढू देत नाही.
भात हे हलके अन्न मानले जाते. तांदळात कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात. चपातीच्या तुलनेत भातामध्ये कमी फायबर आणि प्रोटिन्स असतात, तर कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. तसेच स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला भात पचवण्यास सोपे असते, तर चपाती पचवण्यास वेळ लागते . भातात फोलेटचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रात्रीच्या जेवणात आपण चपाती खाल्ली पाहिजे. याचे कारण म्हणजे चपातीत फायबर्स जास्त प्रमाणात असतात जे आपले पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. रात्री दोन चपात्या, एक वाटी डाळ किंवा एक वाटी भाजी आणि दही खाणे चांगले. पण जर तुम्हाला भातच खायचा असेल, तर खिचडी बनवा आणि त्यात भरपूर डाळ आणि भाज्या घाला. यामुळे तुमचे पोट भरलेले राहील आणि शरीराला पोषक तत्वेही मुबलक प्रमाणात मिळतील.