सिंगल-कॉटन पट्टी किनार साड्या महाराष्ट्राची कुशल कारागिरी; पारंपरिक वारसा जतन करण्यासाठी एनआयएफटीचा पुढाकार
मुंबई/नीता परब : विदर्भाचा समृद्ध असा पारंपरिक हस्तकला वारसा जतन करण्यासाठी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनअायएफटी) या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. सिंगल-कॉटन धाग्यापासून विणलेल्या धापेवाडा गावातील पट्टी किनार साड्या या महाराष्ट्राच्या कुशल कारागिरीचा पुरावा आहे. मात्र, सध्या मशीन-निर्मित कापडांच्या रेट्यामुळे साधे पण उठावदार, नजाकतदार असे हे एलिगंट वस्त्र लाेप पावत अाहे की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
समृद्ध विणकाम परंपरेचा कलाकृतीच्या पलीकडे मागोवा
‘एनआयएफटी’ तर्फे भारताच्या पारंपारिक हस्तकलेचे जतन करणे आणि हे कलाशास्त्र समजून घेण्यासाठी हस्तकला संशोधन दस्ताऐवजीकरण केले जाते. सध्या प्राध्यापक संदीप किडीले यांच्या मार्गदर्शनाखाली, एनआयएफटी संस्थेचे विद्यार्थी विदर्भातील पट्टी किनार साड्यांच्या समृद्ध विणकाम परंपरेचा मागोवा घेत आहेत. प्रा. किडीले आणि विद्यार्थ्यांची टीम प्रत्यक्ष धापेवाडा गावात जाऊन राहिली. तिथे पट्टी किनार साड्यांची समृद्ध विणकाम परंपरा व या कलाकृतीच्या पलीकडे, त्यांनी कारागिरांशी संवाद साधला. त्यांचे अनुभव जाणून घेतले. सध्या ही परंपरा टिकविण्यासाठी असलेली आव्हाने आणि आकांक्षा याबद्दलही एनआयएफटी टीमने सखोल अंतर्दृष्टी मिळवली आहे.
पिढ्यानपिढ्या जपलेला साधा पण सुंदर सौंदर्य साज
सिंगल-कॉटन धाग्यापासून विणलेल्या पट्टी किनार साड्या महाराष्ट्राच्या कुशल कारागिरीचा पुरावा आहेत. या साड्या अतिरिक्त विणण्याच्या तंत्राचा (एक्स्ट्रा वेफ्ट टेक्निक) वापर करून तयार केल्या जातात. आकर्षक डिझाईन अािण मनमोहक नक्षीदार बुटीजसाठी त्या ओळखल्या जातात. यात विणकरांचे अतिशय तपशीलवार काम दिसते. सूक्ष्म डिटेलिंग आणि आकृतिबंध प्रत्येक साडीला अधिक युनिक अन स्पेशल बनवतात. प्रत्येक पट्टी किनार साडीची लांबी ६.५ मीटर असते आणि त्यात ३-इंच साधा बॉर्डर असतो, जो एक साधा पण सुंदर सौंदर्य साज देतो. ही कला पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे, ज्यामुळे विदर्भाच्या विणकाम समुदायाचा वारसा जपला जात आहे.
मशीन-निर्मित कापडांच्या रेट्यापुढे परंपरेचा वारसा धोक्यात
तथापि, ही परंपरा सध्या धोक्यात आली आहे. मशीन-निर्मित कापडांच्या स्वस्त आणि मुबलक उपलब्धतेच्या रेट्यापुढे या पारंपरिक साड्यांची मागणी कमी झाली आहे, ज्यामुळे कारागिरांच्या उपजीविकेलाही धोका निर्माण झाला आहे. एकेकाळी भरभराटीला आलेल्या अनेक सहकारी संस्था आता उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आर्थिक अस्थिरता आणि मर्यादित संधींचा सामना करणारी विणकरांची तरुण पिढी या कलाकृतीपासून दूर जात आहे. सरकारी पातळीवर त्वरित हस्तक्षेप न केल्यास, विदर्भाचा हा मौल्यवान वस्त्र कला वारसा लाेप हाेऊन शक्यताे अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारी पातळीवर धोरणात्मक प्रयत्नांची आवश्यकता
पट्टी किनार साडीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे, जसे की – तरुण कारागिरांना प्रशिक्षण देणे, समकालीन डिझाइन एकत्रित करणे आणि व्यापक बाजारपेठेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणे. डिझायनर सहयोग आणि शाश्वतता-चालित उपक्रम या कलाकृतीमध्ये नवजीव अाणू शकतात, ज्यामुळे ते जागतिक ग्राहकांना आकर्षित करेल. हातमाग क्षेत्राला बळकटी दिल्याने विणकरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणेच नव्हे तर स्थानिक रोजगार आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
सरकारी संस्थांशी सहायोगाचा ‘एनआयएफटी’ कडून प्रयत्न
पट्टी किनार साड्यांच्या उत्पादन विकासासाठी एनआयएफटी टीम सध्या नागपुरातील राज्य सरकारी संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य हातमाग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केंद्र सरकारच्या विणकर सेवा केंद्र यांच्याशी सहयोग करण्याचा प्रयत्न करत आहे.
परंपरा, आधुनिकतेच्या संगमाने जागतिक बाजारात ठसा
‘एनआयएफटी’ ही संस्था विदर्भाच्या या वारशाचे जतन आणि पुनरुज्जीवनासाठी समर्पित आहे. धापेवाडाचा विणकामाचा वारसा चमकत राहील, याची आम्हाला खात्री आहे. शिक्षण, नावीन्य आणि बाजारपेठ विस्ताराद्वारे, आम्ही या कलेचे चांगले भविष्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, जिथे परंपरा आणि आधुनिकता एकत्र राहतील. फॅशनच्या विकसित जगात पट्टी किनार साड्यांसाठी नक्कीच मजबूत व सुरक्षित जागा होईल, हा आमचा विश्वास आहे. ही कला जतन करणे केवळ कापड जपण्याबद्दल मर्यादित नाही, तर इतिहास, संस्कृती आणि हा वारसा जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांचा सन्मान करण्याबद्दल आहे.
-प्रा. संदीप किडीले,
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, मुंबई.