उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश
सध्या लोकांचे आयुष्य अगदी धावपळीचे झाले आहे. कोणालाही स्वतःसाठी अजिबात वेळ नाही. व्यायामाचा अभाव, चुकीचे खानपान अशा अनेक कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.वृद्धांबरोबरच तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबसारख्या यांचे प्रमाणात वाढत आहे.
शरीरात उच्च रक्तदाब वाढला की अनेक समस्या उद्भवतात. रक्तदाब वाढल्यावर छातीत दुखणे, डोकेदुखी, दृष्टी कमी होणे आणि दिवसभर आळस आणि सुस्तपणा जाणवू लागतो. तसेच रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सकस आहार खूप महत्त्वाचा आहे. रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात या 4 गोष्टींचा अवश्य समावेश करावा.
1. हिरव्या पालेभाज्या
आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश रक्तदाबाच्या रुग्णांसाठी भरपूर लाभदायक आहे. पालक, मेथी, आणि लेट्युससारख्या हिरव्या पालेभाज्या खाव्यात. त्यामुळे शरीराला भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
2. केळी
उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने जेवणात केळीचा समावेश करावा. केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दिवसातून एक तरी केळं नक्की खायला हवं. पोटॅशियम मूत्रपिंडांतील अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करते.
3. बीट
बीटरूटमध्ये नायट्रिक ऑक्साईड जास्त असते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा प्रवाह सुधारतो. म्हणून रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात बीटचा समावेश जरूर करवा. बीटरूटचे सॅलड किंवा भाजी करुन खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाणही वाढेल.
4. ड्रायफ्रूट्स
काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता हे ड्रायफ्रूट्स सकाळी नक्की खावेत. काजुमध्ये पोषकत्त्वे, पोटॅशियम आढळते. हे घटक उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात यांचा नक्कीच समावेश करावा. अक्रोडमध्ये झिंक, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई, आणि इतर अँटीऑक्सिडंट यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. नियमित बदामाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. बदामामधील अल्फा-टोकोफेरॉल रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पिस्तामध्ये पोषकत्त्वे आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रीत राहतो. म्हणून आहारात समावेश करा. वरील सर्ल पदार्थाच्या रोजच्या सेवनामुळे तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास नक्की मदत होईल.