फोटो सौजन्य - Social Media
भारतामध्ये आंब्याच्या असंख्य प्रकारांपैकी लंगडा आंबा हा नावाने जितका वेगळा वाटतो, तितकाच तो चवीलाही खास असतो. पण अनेकांना प्रश्न पडतो की, या आंब्याचं नाव “लंगडा” का पडलं? या नावामागे एक अतिशय जुनी आणि रोचक कथा दडलेली आहे, जी आपल्याला तब्बल ३०० वर्षांपूर्वीच्या बनारसच्या गल्लीबोळांत घेऊन जाते. कथा अशी सांगितली जाते की, बनारसच्या एका मंदिरात एक लंगडणारे (दिव्यांग) पुजारी राहत असत, ज्यांना लोक प्रेमाने “लंगडा पुजारी” म्हणत. एक दिवस एका साधूने त्या पुजाऱ्याला आंब्याची काही बी दान दिली आणि सांगितले की, या बीजांना मंदिराजवळ लावा आणि जेव्हा फळ येतील तेव्हा पहिले फळ देवाला अर्पण करा आणि मग भक्तांना वाटा.
काही वर्षांतच त्या झाडावर जे आंबे आले, ते इतके चवदार, रसभरित आणि सुगंधी होते की, ज्याने एकदा चाखले त्याला ते कधीही विसरता आले नाहीत. जेव्हा लोकांनी विचारले की हा आंबा कुठून आला, तेव्हा उत्तर मिळालं “ते लंगडा पुजाऱ्याचं झाड आहे”. आणि हळूहळू त्या आंब्याचा ओळखच लंगडा आंबा म्हणून झाली.
आज हा आंबा बनारसच्या ओळखीचा भाग बनला आहे. उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये याची प्रचंड मागणी असते. त्याच्या खास चवेमुळे तो निरनिराळ्या मिठाई, पल्प, रस आणि डेसर्ट्समध्ये वापरला जातो.
चवतर अप्रतिम आहेच, पण आरोग्यदृष्ट्याही लंगडा आंबा खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये विटामिन C, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत करतात. फायबरमुळे पचनसंस्था मजबूत राहते आणि अपचन, गॅस व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात.
लंगडा आंबा हे उदाहरण आहे की, एखाद्या गोष्टीचं नाव किंवा बाह्यरूप महत्त्वाचं नसतं, तर तिचे गुण, इतिहास आणि उपयोग यावरच तिचं खरे मूल्य ठरतं. लंगडा आंबा हा केवळ आंबा नाही, तर एका परंपरेचा, श्रद्धेचा आणि अनोख्या चविचा वारसा आहे.