फोटो सौजन्य - Social Media
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-WPU) आणि वाधवानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाधवानी इग्नाइट बूटकॅम्प : राइड २०२५ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत केवळ २४ तासांत ७,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी १५०० डिजिटल उपक्रम सुरू करून आशियामध्ये एक विक्रम प्रस्थापित केला आहे. हे बूटकॅम्प पूर्णतः विनामूल्य असून, विद्यार्थ्यांना जागतिक प्रमाणपत्र, मार्गदर्शन व उपयुक्त साधने मिळतात.
एमआयटी-WPU मधील १२ शाळा आणि ३० विभागातील दुसऱ्या वर्षातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातच उद्योजकीय क्षमतांचा विकास करून त्यांना स्वतःचे उपक्रम सुरू करण्यास प्रेरित करणे हा आहे.
या उपक्रमास वाधवानी फाउंडेशनच्या ‘इग्नाइट’ प्रोग्रामचा आधार असून, याआधीही १५०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे. संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव वॉरियर यांनी सांगितले की, ”वाधवानी फाउंडेशनमध्ये, आम्ही व्यक्तींना त्यांची पूर्ण क्षमता ओळखण्यास आणि उद्योजकतेमध्ये झेप घेण्यास सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय भावना जोपासणे, आवश्यकतेनुसार समर्थन देणे आणि त्यांना वेगवान वाढीसाठी तयार करणे यांना प्राधान्य देतो. एमआयटी डब्ल्यूपीयू सोबतच्या या सहयोगामधून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी वास्तविक संधी प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. विद्यार्थ्यांना योग्य साधने, मार्गदर्शन आणि प्लॅटफॉर्मसह सुसज्ज करून आमचा रोजगार निर्माण करणाऱ्या पिढीचे संगोपन करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते भारताच्या आर्थिक भविष्याला आकार देऊ शकतील.”
एमआयटी-WPUच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, ”वाधवानी फाउंडेशनसोबतच्या या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही वर्गाबाहेर प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने अत्यंत आवश्यक पाऊल उचलत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी, त्यांचे ज्ञान व्यावहारिक, उच्च-स्तरीय वातावरणात वास्तविक जीवनातील आव्हाने सोडवण्यासाठी वापरण्यास मदत करण्यासाठी आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम केवळ उद्यम सुरू करण्याबद्दल नाही तर झपाट्याने बदल होत असलेल्या जगात नेतृत्व करण्यास सुसज्ज आत्मविश्वासू, सर्जनशील समस्या सोडवणाऱ्यांना घडवण्याबद्दल आहे.” विद्यार्थ्यांच्या निवडलेल्या उपक्रमांपैकी टॉप १० प्रोटोटाइप्सना रु. १ लाखांचे सीड फंडिंग दिले जाईल, तसेच इन्क्युबेशन व अॅक्सेलरेशन सपोर्ट देखील दिला जाणार आहे. हा बूटकॅम्प स्टार्टअप एक्स्पो २०२५ मध्ये समाप्त होईल, जिथे टॉप १५० उपक्रमांचे सादरीकरण उद्योग व गुंतवणूकदारांसमोर केले जाईल.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात उतरवण्यास सक्षम करणारा एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक अनुभव आहे.