फोटो सौजन्य - Social Media
कोकणात रात्रीचे खेळ फार भयाण असतात. आकाशात ताऱ्यांचा पहारा आणि जमिनीवर भुतांचा खेळ सारा! कोकणकरांसाठी हे काही नवीन नाही. त्यांच्या अनुभवात या गोष्टी अनेकदा होतात. पण काही अनुभव इतके भयाण असतात की अनुभव घेणारा व्यक्ती स्वतः कुणाच्या तरी आठवणींमध्ये विलीन होतो. अशीच एक घटना कोकणातील म्हसळा तालुक्यात घडली आहे. म्हसळा कोकणातील रायगड जिल्ह्यातील निसर्गाने नटलेला फार सुंदर तालुका आहे.
म्हसळ्यातील कोंडवली गावातील ही घटना आहे. गावात कैक वर्षांपूर्वी एखादं जोडपं त्यांच्या आई-वडिलांसह राहत होतं. पण मुलाला कामधंद्यासाठी मुंबईला जावं लागत. कामावरून सुट्टी मिळाली होती म्हणून तो संध्याकाळच्या १० च्या ST ने मुंबईहून गावाकडे निघाला होता. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती, त्यामुळे तो रात्री २ च्या सुमारास गावच्या ST थांब्याच्या येथे येऊन ठेपला. त्याकाळी वीज वगैरे असा काही जास्त प्रकार नव्हता. गावाकडे फार कमी जणांकडे वीज होती. विमल ST स्टॅन्डवर येऊन पोहचतो. त्याला सोडून ST पुढे निघू लागते.
जिथे पाहाल तिथे काळोख अन् याचे घरही तसे स्टॅन्डपासून फार लांब होते. त्या काळोखात विमल घराच्या वाटेने चालू लागला. रस्त्यावर दूरच एक व्यक्ती हातात काठी ठेऊन हळुवार चालत होता. विमलच्या जीवात जीव आला, तो धावत त्या व्यक्तीकडे पोहचला. दोघेही हसत खेळत होते. त्या वृद्ध व्यक्तीने तर विमलकडून बिडीही मागितली. दोघे घराच्या पडवीत येऊन उभे राहिले. विमलने घराचा दार ठोकला. विमलची बायको बाहेर आली. विमलला पाहून ती फार खुश झाली.
विमलने तिला त्या वृद्ध व्यक्तीसाठी पाणी आणायला सांगितले. विमलच्या बायकोने आतून तांब्याभर पाणी आणले आणि बाहेर बघताच ती जोरात किंचाळली. तिच्या हातातील सगळ्या वस्तू सांडल्या. कारण बाहेर तिच्या डोळ्यासमोर विमल जमिनीवर मृत्यू पडला होता. हा खून म्हणता येणार नाही कारण त्याच्या शरीरावर कुणी कोल्हा किंवा इतर रानटी जनावर चावला असावा अशा जखमा होत्या. त्यांनतर असे म्हंटले जाते की म्हसळा तालुक्यातील कोंडवली ST स्टॅन्डवर अजूनही रात्रीच्या प्रहरी विमल चालताना दिसतो.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)