त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येकजणच कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला आहे. कुणाला आरोग्याची समस्या भेडसावत आहे तर कुणाला केसांची तर कुणाला त्वचेसंबंधित समस्या त्रास देत आहे. या सर्वच समस्यांचे मूळ कारण म्हणजे आपला चुकीचा आहार. आपण जे काही खातो त्याचा थेट परीणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशात तुम्हाला फार काही महागड्या गोष्टींची आवश्यकता नाही तर काही सामन्य मसाल्यांचा आपल्या आहारात समावेश करुनही तुम्ही तुमचे स्वास्थ निरोगी ठेवू शकता.
बऱ्याचदा अनेक समस्येवरचा उपाय हा आपल्या घरातच दडलेला असते, ज्याकडे आपले लक्ष जात नाही. स्वयंपाकघरात आढळणारे मसाले अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेले असतात, ज्यामुळे यांचा वापर केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, आपल्या स्वयंपाकघरातील हळद, दालचिनी, लवंग आणि मेथीसारखे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर त्वचा आणि केसांना आतून पोषण देण्याचेही काम करतात. हे चार देशी पदार्थ आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोणत्या वरदानाहून कमी नाहीत. प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर जुश्या भाटिया सरीन यांनी या चार देसी पदार्थांचे महत्त्व समजावून सांगितले आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हळद
जुन्या काळापासून जखम ठिक करण्यापासून ते त्वचा निखळ बनवण्यापर्यंत हळदीचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. यातील र्क्यूमिन या संयुगात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे मुरुमे, डाग आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. याच्या वापरामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि निखळ बनण्यास मदत होते. शिवाय हे टाळूला आराम देते ज्यामुळे कोंडा, केसगळती असा समस्यांपासून आराम मिळतो.
दालचिनी
दालचिनीचा गोड आणि तिखट सुगंध जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्याला अनेक फायदेही मिळवून देतो. याचे सेवन शरीरात रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते, त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळवून देते आणि शरीरातील पोषण सुनिश्चित करते. दालचिनी केसांना मजबूत करते, केसगळती कमी करते आणि केसांना जाड आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
लवंगा
लवंगातील अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे ते त्वचा आणि टाळूच्या समस्यांसाठी एक उत्तम पर्याय बनतात. याचे सेवन मुरुम निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांशी लढतात आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यासहच केसांवरही याचा चांगला परीणाम दिसून येतो. तुम्ही केसांसाठी लवंगाचे तेल वापरु शकता. हे केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी, टाळूला पोषण देण्यासाठी आणि केसांच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी ठरेल.
मेथीदाणे
कडुसर मेथीदाणे केसांसाठी आणि त्वचेसाठी अैाषधी उपाय ठरतो. केसांसाठी हे एक सुपरफूड मानले जाते. यामध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केसगळती थांबवण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात. मेथीची पेस्ट करुन केसांना लावल्याने केस मजबूत, मऊ आणि चमकदार होतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.