लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सतत जंक फूडचे सेवन करणे, अतितिखट तेलकट पदार्थ खाणे, अपुरी झोप, धूम्रपान किंवा शारीरिक हालचाली न केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, रक्तदाब यासोबतच लिव्हरच्या समस्या सुद्धा उद्भवू लागतात. हल्ली अनेकांना फॅटी लिव्हर आणि लिव्हर सोरायसिसची समस्या उद्भवू लागली आहे. लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासोबतच अनेक महत्वाची कामे करतो. त्यामुळे लिव्हर कायमच निरोगी असणे जास्त गरजेचे आहे. पण बऱ्याचदा लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये चरबी साठून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. कारण शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जात नाहीत. ज्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते आणि वारंवार थकवा जाणवू लागतो. छोटीमोठी काम करताना शरीर सतत थकल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे वारंवार शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
लिव्हरमध्ये वाढलेली अनावश्यक चरबी लिव्हरच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर लिव्हर फॅट योग्यरीत्या पचवू शकत नाही, ज्यामुळे पोटावर चरबी वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा पोटात गॅस होणे, अपचन, जडपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
लिव्हरसबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यास लघवीच्या रंगात बदल होतो. लघवीचा रंग गडद पिवळा दिसू लागतो. तसेच डोळ्यांमध्ये पिवळेपणा वाढतो. शरीरात बाइलचे उत्पादन कमी झाल्यामुळे शरीरातील अपायकारक पदार्थ योग्य पद्धतीने बाहेर पडून न गेल्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो.
फॅटी लिव्हरची कारणे काय आहेत?
लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिन प्रतिरोध (Insulin resistance) यांसारख्या चयापचय समस्यांमुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होऊ शकतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होतो.
फॅटी लिव्हरची लक्षणे काय आहेत?
बहुतेक लोकांना फॅटी लिव्हरची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काही लोकांना थकवा, पोटदुखी, वजन कमी होणे किंवा त्वचेला खाज येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. फॅटी लिव्हर वाढल्यास, यकृताला सूज येऊ शकते (Hepatitis), ज्यामुळे सिरोसिस (Cirrhosis) आणि यकृताची समस्या (Liver failure) निर्माण होऊ शकते.
फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावे?
निरोगी वजन राखा, नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, मद्यपान मर्यादित करा किंवा टाळा, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा.