
फोटो सौजन्य - Social Media
डोकेदुखी ही आजच्या काळातील अतिशय सामान्य पण त्रासदायक समस्या बनली आहे. कधी डोकं जड झाल्यासारखं वाटतं, कधी ठणकणारी वेदना होते, तर कधी डोळ्यांच्या मागे टोचल्यासारखी जाणीव होते. अशा डोकेदुखीमुळे संपूर्ण दिवसाचा मूड आणि कामावरचा परिणाम होतो. अनेक जण लगेच वेदनाशामक औषधांचा आधार घेतात; मात्र काही वेळाने डोकेदुखी पुन्हा डोके वर काढते. AIIMS-प्रशिक्षित न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियांका सेहरावत यांच्या मते, वारंवार होणारी डोकेदुखी ही केवळ आजार नसून ती आपल्या जीवनशैलीतल्या चुकांची सूचना असू शकते.
डॉ. प्रियांका सांगतात की ८० ते ९० टक्के डोकेदुखीच्या प्रकरणांमध्ये कोणताही गंभीर आजार नसतो. डोकेदुखीचं सर्वात मोठं कारण म्हणजे सकाळचा नाश्ता न करणे. वजन कमी करण्यासाठी किंवा घाईगडबडीत अनेक जण नाश्ता टाळतात. यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. परिणामी डोकेदुखी सुरू होते. तसेच जेवणाची वेळ ठरलेली नसेल, उशिरा दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण चुकवणं या सवयी डोकेदुखीची सवय लावतात.
रोज उशिरा झोपणं आणि पुरेशी झोप न घेणं हेही डोकेदुखीचं मोठं कारण आहे. शरीर आणि मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती न मिळाल्यास सकाळी उठल्यावर डोकं जड आणि दुखरं वाटतं. झोपण्याआधी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहण्याची सवय झोपेची गुणवत्ता आणखी खराब करते. आजच्या बसून काम करणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक लोक तासन्तास एकाच जागी बसून राहतात. चालणं-फिरणं, व्यायाम यांचा अभाव असल्याने शरीरात ताण साचतो. हाच ताण डोकेदुखीच्या स्वरूपात बाहेर पडतो. यासोबतच कमी पाणी पिण्याची सवय म्हणजेच डिहायड्रेशनही डोकेदुखी वाढवते. अनेकदा केवळ पाण्याच्या कमतरतेमुळेही तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
सततचा कामाचा ताण, जास्त विचार करणे, ऑफिसची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळे घटक डोकेदुखीला आमंत्रण देतात. मेंदू सतत तणावात राहिल्यास त्याचे दुष्परिणाम वेदनेच्या स्वरूपात जाणवतात. डॉ. प्रियांका यांच्या मते, औषधे तात्पुरता आराम देतात; मात्र कायमस्वरूपी उपाय जीवनशैलीत बदल केल्यानेच होतो. वेळेवर नाश्ता व जेवण, रोज ७–८ तासांची झोप, उशिरा मोबाईल वापरणे टाळणे, हलका व्यायाम, नियमित चालणे आणि भरपूर पाणी पिणे या सवयी अंगीकारल्यास डोकेदुखीपासून मोठ्या प्रमाणात सुटका मिळू शकते. डोकेदुखी ही अचानक होणारी गंभीर समस्या नसून, बहुतेक वेळा ती आपल्या रोजच्या चुकीच्या सवयींचा परिणाम असते. वेळीच जीवनशैलीत सुधारणा केल्यास औषधांशिवायही डोकेदुखीवर नियंत्रण मिळवता येते.