
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात हवाई प्रवास सर्वसामान्य झाला असला, तरी फ्लाइटशी संबंधित अनेक नियम आणि गोष्टींबाबत प्रवाशांमध्ये अजूनही संभ्रम असतो. विशेषतः गर्भवती महिलांच्या प्रवासाबाबत आणि फ्लाइटमध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास त्या बाळाला नेमके कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळते, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आश्चर्याची बाब म्हणजे यासंदर्भातील नियम देशागणिक वेगवेगळे आहेत.
जर तुम्ही गर्भवती महिलेसोबत फ्लाइटने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. flight-delayed.com या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सामान्य गर्भधारणेत ३६ आठवड्यांपर्यंत फ्लाइटने प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र, जुळी किंवा एकाहून अधिक बाळे असतील, तर ३२ आठवड्यांपर्यंतच हवाई प्रवास करण्याचा सल्ला दिला जातो. तरीही, प्रवासापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक मानले जाते, कारण बहुतेक डॉक्टर ३६ आठवड्यांनंतर फ्लाइट प्रवास टाळण्याचा सल्ला देतात.
फ्लाइटमध्ये बाळाचा जन्म होणे ही फारशी सामान्य घटना नाही. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अहवालांनुसार, १९२९ ते २०१८ या कालावधीत जगभरात अवघ्या ७४ बाळांचा जन्म फ्लाइटमध्ये झाल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी, प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर महिलेला फ्लाइटमधील सर्वात सुरक्षित आणि आरामदायक ठिकाणी हलवले जाते. एअर होस्टेसना अशा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष प्रशिक्षण दिलेले असते. त्या एईडी (AED) आणि सीपीआरसारख्या प्राथमिक वैद्यकीय उपायांचा वापर करून महिलेची काळजी घेतात.
बाळाचा जन्म झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे नागरिकत्वाचा. फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळेल, हे त्या देशाच्या कायद्यांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, अमेरिकेत ‘जस सोलि’ म्हणजेच ‘भूमीचा अधिकार’ हा नियम लागू आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हवाई हद्दीतून जात असताना जर बाळाचा जन्म झाला, तर त्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. मात्र, अमेरिकेतील सत्ताबदलानंतर या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने पूर्वतयारी आवश्यक ठरते.
युनायटेड किंगडममध्ये मात्र ‘जस सॅंग्विनिस’ म्हणजेच ‘रक्ताचा अधिकार’ हा नियम लागू आहे. त्यामुळे यूकेच्या हवाई हद्दीत बाळाचा जन्म झाला, तरी त्या बाळाला आपोआप ब्रिटिश नागरिकत्व मिळत नाही. बाळाची नागरिकता ही त्याच्या आई-वडिलांच्या नागरिकत्वावर आधारित ठरवली जाते.
काही वेळा फ्लाइट अशा आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रातून जाते, जिथे कोणत्याही देशाचा दावा नसतो. अशा ठिकाणी बाळाचा जन्म झाल्यास, जन्म प्रमाणपत्रावर जन्मस्थान म्हणून ‘आंतरराष्ट्रीय क्षेत्र’ असे नमूद केले जाते. जर बाळाचा जन्म आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात झाला, तर जन्मस्थान म्हणून ‘समुद्रात’ अशी नोंद केली जाते.
फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर मोफत हवाई प्रवास मिळतो, असा गैरसमजही अनेकांमध्ये आहे. प्रत्यक्षात, असे फायदे फारच मोजक्या एअरलाईन्स देतात. थाई एअरवेज, एअरएशिया, इजिप्टएअर आणि काही आशिया-पॅसिफिक एअरलाईन्स अशा बाळांना आयुष्यभर मोफत प्रवासाची सुविधा देतात. तर व्हर्जिन अटलांटिकसारख्या एअरलाईन्स ठराविक वयापर्यंतच मोफत प्रवासाची सवलत देतात.
एकूणच, फ्लाइटमध्ये जन्म ही दुर्मिळ घटना असली, तरी त्यासंबंधीचे नियम अत्यंत रंजक आणि देशनिहाय वेगवेगळे आहेत. त्यामुळे हवाई प्रवास करताना या गोष्टींची माहिती असणे निश्चितच उपयुक्त ठरते.