
फोटो सौजन्य - Social Media
फॉग म्हटले की आपल्या डोळ्यासमोर थंड हवेमुळे पसरलेले धुकं येते, पण तुम्हाला माहिती आहे का की असे धुकं आपल्या मेंदूवरही पसरू शकते? यालाच ‘ब्रेन फॉग’ म्हणतात. यामुळे विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. या स्थितीत तुम्हाला सामान्य संवाद साधताना अडचणी येऊ शकतात, तसेच साधे काम पूर्ण करणेही कठीण वाटू शकते.
ब्रेन फॉगमुळे मेंदूतील स्मृती सहजपणे रिकॉल करता येत नाहीत. समोर ठेवलेली वस्तू दिसत असूनही त्याचा थांग लागत नाही, तर कधी कोणत्या कामासाठी जाऊन त्याचे कारणच विसरून परत येतो. ही परिस्थिती विचार करण्याच्या प्रक्रियेला पूर्णपणे प्रभावित करते. यामुळे डोकेदुखी, मानसिक थकवा आणि गोंधळ यासारखी लक्षणे निर्माण होतात.
ब्रेन फॉगची अनेक कारणे असू शकतात, पण यामध्ये चुकीची जीवनशैली हे सर्वात मोठे कारण आहे. अपुरी झोप घेतल्यास या त्रासला पालवी फुटते. जास्त जंकफूड व साखर खाल्ले कि ब्रेन फॉग होण्याची शक्यता असते. जास्त तणाव घेतल्यानेही हास त्रास वाढीस लागतो. तर कधी कधी शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे ब्रेन फॉग तयार होतो. प्रदूषण, औषधांचे दुष्परिणाम, पोषणमूल्यांची कमतरता, तसेच स्क्रीनसमोर अधिक वेळ घालवणे यांचादेखील ब्रेन फॉग निर्माण होण्याचा कारणात समावेश होतो.
या समस्येपासून बचावासाठी काही गोष्टी उपयोगी ठरू शकतात. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे. जास्त मद्यपान किंवा धूम्रपान करत असाल तर त्याला आजपासूनच कमी करा किंवा ते पूर्णपणे थांबवा. जास्त कॅफिनच्या सेवनापासून दूर राहात चला. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान करणे आवश्यक आहे. पझल गेम्स खेळल्यास मेंदूला चालना मिळते. याशिवाय, आहारात पोषणमूल्यांनी समृद्ध पदार्थांचा समावेश करावा आणि साखर व जंकफूड टाळावे. जास्त मसालेदार खाणे टाळावे. शक्यातो घरातील पोषक अन्नाचे सेवन करत चला.
ब्रेन फॉग ही वैद्यकीय स्थिती नसली तरी ती दुर्लक्षित करणे योग्य नाही. योग्य जीवनशैली आणि तणावरहित दिनचर्येचा स्वीकार केल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. या संबंधित काही त्रास जाणवला किंवा दिसून आला. किंवा या त्रासात वाढ होऊ लागली तर कधी ही डॉक्टरांची धाव घेणे किंवा उपचार करणे योग्य ठरेल.