फोटो सौजन्य - Social Media
आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, पण जगात एखाद्या बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पोटातच दुसरं बाळ सापडल्याची घटना घडली आहे. ऐकायला विचित्र वाटणारी घटना हाँगकाँगमधील आहे. ही स्थिती अत्यंत दुर्मिळ असून जगभरात आजपर्यंत अशा फक्त 200 पेक्षा कमी केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. ही स्थिती फार कमी आढळते पण यावर उपचार शक्य आहे. वेळीच उपचार केल्यास बाळाला बरे करता येते. हॉंगकॉंगमध्ये आढळून आलेली ही घटना याच स्थितीशी निगडित असून बाळाचे वेळीच उपचार करून बाळ आता बरा होत आहे.
एका नवजात बाळाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटात एक असामान्य गाठ असल्याचे निदान केले. स्कॅन केल्यावर लक्षात आलं की ही गाठ सामान्य नसून त्यात विकसित होत न आलेल्या भ्रूणासारखी रचना आहे. त्यात मणक्याचा भाग आणि हात-पायांसारखी वैशिष्ट्ये होती. थोडक्यात सांगायचं झालं, तर हे बाळ गर्भाशयात असतानाच त्याने आपल्या जुळ्या भावंडाला शोषून घेतलं आणि ते त्याच्या शरीरातच वाढत राहिलं.
या स्थितीला Fetus-in-Fetu (FIF) असे म्हटले जाते. सामान्यतः जुळ्यांमध्ये गर्भधारणा होताना एका भ्रूणाचा विकास दुसऱ्याच्या तुलनेत नीट होत नाही आणि त्या दुबळ्या भ्रूणाचा काही भाग दुसऱ्या भ्रूणात सामावून जातो. बहुतेक वेळा ही गाठ गर्भाशयाच्या आत असते, पण काही वेळा ती बाळाच्या जन्मानंतरही आढळते.
सुदैवाने, डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून त्या असामान्य भागाला बाहेर काढले. ही सर्जरी यशस्वी झाली असून बाळ आता चांगले बरे होत आहे. या स्थितीमुळे बाळाच्या आरोग्यावर कायमस्वरूपी दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते, विशेषतः वेळेवर उपचार झाले तर.