Chhatrapati Shivaji Maharaj : गारद म्हणजे काय ? काय आहे त्याचा अर्थ, कुठे आणि कशी दिली जाते गारद ?
रयतेचा राजा आणि सह्याद्रीचा वाघ असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या जल्लोषात साजरा केली जाते. शिवकालीन काळात छत्रपतींच्या सिंहासनावर बसलेल्या राजाला मुजरा केला जात असे. त्याचबरोबर शिवरायांच्या काळात गारद देणं हा देखील एक शाही राजेशाही रिवाज होता. गारद म्हणजे काय आणि ती नेमकी कशी दिली जाते हे जाणून घेऊयात.
गारद म्हणजे राजाच्या दरबारात प्रवेश करताना दिली जाते ती घोषणा. हल्ली सोशल मीडियावर ट्रेंड म्हणून गारद कुठेही आणि कशीही दिली जाते.
गारद ही कुठेही दिली जात नाही. गारद राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दिली जाते. जेव्हा राजा छत्रपती म्हणून सिंहासनारुढ होणार असतात तेव्हा गारद दिली जाते.
छत्रपती शिवरायांची गारद
आस्ते कदम,आस्ते कदम, महाराज गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्टीत, न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत,राजनितीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावधंस, सिंहसनाधिश्वर महाराजाधिराज, राजाशिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
याचा नेमका अर्थ काय ?
गडपती- ज्या राजाची गडकोटावर सत्ता आहे असा हा गडपती
गजअश्वपती- लढाई आणि पराक्रम गाजविण्यासाठी ज्याची स्वत:ची हत्ती आणि घोडे आहे आहेत असा राजा गजअश्वपती आहे.
भूपती प्रजापती- राज्यचा कारभार सांभाळणाऱ्या राजाचा राज्याभिषेक म्हणजे भूमीशी झालेला विवाह, आणि प्रजेचा संरक्षक या अर्थी भूपती आणि प्रजापती.
सुवर्णरत्नश्रीपती
रत्नजडित दागिन्यांवर अधिपत्य असलेला राजा.
अष्टवधानजागृत
राज्याच्या आठही दिशांवर लक्ष देणारा कायम जागृत असलेला राजा.
अष्टप्रधानवेष्टीत
आठ प्रधानांचा राज्याच्या कारभारात सल्ला घेणारा राजा
न्यायालंकारमंडित
सत्याच्या बाजूने योग्य न्यायनिवाडा करणारा राजा
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
शस्त्र आणि शास्त्र यांच्यात निपुण असलेला राजा
राजनितीधुरंधर
रयतेच्या आणि राज्याच्या संरक्षणासाठी राजकारणाती डावपेच ओळखणारा राजा
प्रौढप्रतापपुरंदर
शौर्य आणि पराक्रम गाजविणारा साहसी योद्धा असा हा राजा
क्षत्रियकुलावतंस
क्षत्रिय कुळातील पराक्रमी राजा
सिंहसनाधिश्वर महाराजाधिराज
सुवर्णजडीत सिंहासनावर विराजमान झालेला हा राजा. असा शिवरायांना दिल्या जाणाऱ्या या गारदचा अर्थ आहे
गारद कधी दिली जाते ?
शिवकालीन काळात राजाचा राज्याभिषेक होत असताना सिंहासनावर आरुढ होताना ही गारद दिली जायची. शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी गारद देण्यात आली होती. त्यावेळच्या राजांचा मंत्रिमंडळात असा सन्मान करण्याची ही रीत होती. सध्या रिल्सच्या माध्यमातून अनेकदा सिनेमागृहात, एखाद्या चौकात गारद दिली जाते. जे काहीसं चुकीचं आहे. रयतेच्या या राजाचा पराक्रम थोर आहे त्यामुळे गारद देताना आदर व्यक्त केला जातो म्हणून गारद ही गडकोटावर देताना अनवाणी असणं गरजेचं आहे.