फोटो सौजन्य - Social Media
आजच्या घडीला भारतीय महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, भारतातील सुमारे 3 ते 13 टक्के महिलांना कोरोनरी आर्टरी डिजीज (हृदयविकाराचा प्रकार) आहे. हे प्रमाण वयानुसार वेगवेगळं आहे. विशेषतः गेल्या 20 वर्षांमध्ये या आकड्यात तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एका संशोधनानुसार, भारतीय महिलांना सरासरी 59 व्या वर्षी हार्ट अटॅक येतो. ही वयाची पातळी विकसित देशांपेक्षा खूपच कमी आहे. एवढंच नाही, तर 2000 मध्ये हार्ट फेल्युअरचे प्रमाण 1.1 टक्के होतं, जे 2015 मध्ये 3.6 टक्क्यांवर पोहोचलं. यावरून स्पष्ट होते की महिलांनी वेळेवर तपासणी करून स्वतःच्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे.
महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा पूर्णतः वेगळी असतात. पुरुषांमध्ये छातीत तीव्र वेदना जाणवतात, तर महिलांमध्ये पोट, कंबर किंवा जबड्याच्या दुखण्याची तक्रार असते. त्याचबरोबर दम लागणे, थकवा, चक्कर येणे, मळमळ असा त्रास होतो. ही लक्षणं अनेकदा अॅसिडिटी, कमजोरी किंवा मानसिक ताण म्हणून दुर्लक्षित केली जातात.
भारतीय समाजात महिलांनी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असल्याने वेळेवर निदान होत नाही आणि त्याचा परिणाम गंभीर होतो. अनेक वेळा घर, काम आणि कुटुंब यातील जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना लक्षणं जाणवत असली तरी त्या दुर्लक्षित केल्या जातात.
विशेषतः 40 वर्षांनंतर थकवा, पोट किंवा छातीच्या वरच्या भागात जळजळ, दम लागणे ही लक्षणं हार्ट अटॅकची पूर्वसूचना असू शकते. याशिवाय प्रेग्नंसीदरम्यान उच्च रक्तदाब, डायबिटीज किंवा PCOS असल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. मानसिक ताण, झोपेची कमतरता, हार्मोनल बदल यामुळेही हृदयावर परिणाम होतो.
महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्हाला अशा लक्षणांचा अनुभव येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. महिलांनी नियमित तपासणी करून आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, कारण वेळेवर उपचार घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात.