सेरेब्रल पाल्सीवर योग्य उपचाराची गरज, कशी घ्यावी काळजी; तज्ज्ञ डॉ. राकेश रंजन यांचा मोलाचा सल्ला
आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस. सेरेब्रल पाल्सी हा मेंदूतील दुय्यम जखमेचा विकार असून, गर्भधारणेदरम्यान गर्भाला ऑक्सिजन किंवा पोषणाचा अभाव होणे, तसेच प्रसूतीदरम्यान ऑक्सिजनची कमतरता निर्माण होणे, ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे न्युरोसायन्सेस व न्युरोसर्जन विभागाचे, वरिष्ठ संचालक डॉ. राकेश रंजन यांनी सांगितले.
सेरेब्रल पाल्सी हा एक न्युरोलॉजिकल विकार असून, तो दीर्घकाळासाठी अपंगत्व निर्माण करून व्यक्तीच्या आरोग्यावर आणि जीवनमानावर परिणाम करतो. “गर्भावस्थेदरम्यान योग्य वैद्यकीय देखरेख, तसेच प्रसूतीच्या वेळी काळजीपूर्वक वैद्यकीय व्यवस्थापन केल्यास सेरेब्रल पाल्सीचे प्रमाण कमी करता येते आणि लवकर निदानही शक्य होते,” असे डॉ. रंजन यांनी स्पष्ट केले.
बालकांमध्ये विकासातील टप्पे उशिरा गाठणे, हालचालींमध्ये असंतुलन, बोलण्यात अडथळा, वाढीचा वेग कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रगत आरोग्यसेवा मर्यादित असल्यामुळे अशा प्रकरणांचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सेरेब्रल पाल्सीमुळे शारीरिक आणि बौद्धिक विकासात विलंब, बोलण्यात व हालचालींमध्ये अडचणी, तसेच दैनंदिन कामकाजात आव्हाने निर्माण होतात. विशेषतः अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये या विकाराचा धोका जास्त असतो. मात्र वेळेवर वैद्यकीय उपचार, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि कुटुंबाकडून मिळणारे भावनिक समर्थन यामुळे मुलांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि ते अधिक चांगल्या जीवनमानाकडे वाटचाल करू शकतात, असे डॉ. रंजन यांनी सांगितले.