रणजित कासलेला कोर्टाचा दणका; तब्बल 'इतक्या' दिवसांची सुनावली कोठडी
मुंबई : बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला रविवारी दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मुंबईत देखील कासलेविरोधात गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक केली. सोमवारी मुंबईतील किल्ला कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता नव्याने दोन गुन्हे दाखल झाल्याने कासले समोरील अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रणजित कासले याला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर कासले याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन आरोप सुरू केले होते. यावेळी पोलिस कासले याला कोर्टाच्या बाहेर घेऊन जात असताना कासले याने सरकारविरोधात घोषणा दिल्या. कासले याने ‘इंकलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय हाय’, अशा घोषणा दिल्या होत्या.
वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले याच्यावर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारींवरुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरुन सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे.
दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल असून, बदनामीकारक भाष्य सोशल मीडियावरून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी ही तक्रार दिली. या दोन्ही तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.