
समृद्धी महामार्गावर 15 पोलिस मदत केंद्रे, नियंत्रण कक्षही तयार; गृहराज्यमंत्री भोयर यांची माहिती
गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. यानुसार पोलिस मदत केंद्र नियंत्रण कक्षासाठी विविध संवर्गातील ४२० नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यामुळे सक्षम पोलिस यंत्रणा कार्यरत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समृद्धीवरील वायफळ, येळाकेळी (वर्धा), धामणगाव-आसेगाव, गावनेर-तळेगाव शिवणी, कारंजा लाड, मालेगाव-जहांगीर, दुसरबीड, सिंदखेड राजा, निढोणा (जालना), सावंगी (छत्रपती संभाजीनगर), हडस-पिंपळगाव, कोकमठाण (शिर्डी), गोंदे-सिन्नर, पिंपरी सद्रोद्दीन (इगतपुरी) आणि शहापूर-खुटघर अशा १५ ठिकाणी पोलिस मदत केंद्रे प्रस्तावित आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे महामार्ग पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
पदांच्या निर्मितीसाठी ४३ कोटी ४७ लाख ३३ हजार ४२४ रुपयांच्या आवर्ती खर्चास व ७ कोटी ४५ लाख ८८ हजार ९६६ रुपयांच्या अनावर्ती खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे.
पुन्हा दगडफेक; दोन वाहनांना लक्ष्य
समृद्धी महामार्गावर करमाड भागात वाहनांवर दगडफेकीचे सत्र सुरूच आहे. याआधीच्या लुटालुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महामार्गावर ८ गस्ती वाहने तैनात असतानाही धावती कार व डंपरवर दगडफेक झाली. महामार्गावरील ३९७ ते ३९८ चॅनलदरम्यान ही घटना घडली. यात कारची समोरील काच फुटली असून, याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. नक्षत्रवाडीचे परमेश्वर पंजरकर (४२) हे मित्र अमोल पाटीलसोबत अर्टिगा कारने नागपूरकडे जात होते. रात्री १० वाजेच्या सुमारास कारच्या काचेवर दगड आदळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पंजरकर गाडी न थांबवता थेट जालनाकडे निघून गेले. त्याचवेळी नागपूरकडे जाणारा एक डंपरदेखील याच भागात दगडफेकीचा बळी ठरला.
FAQ
1. समृद्धी महामार्गावर किती पोलिस मदत केंद्रे स्थापन होणार आहेत?
समृद्धी महामार्गावर १५ महामार्ग पोलिस मदत केंद्रे स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
2. समृद्धी महामार्गावर पोलिस मदत केंद्रांची गरज का भासली?
वाढते अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन, अतिवेगाने वाहन चालविणे आणि वाटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
3. स्वतंत्र नियंत्रण कक्ष कुठे स्थापन होणार आहे?
छत्रपती संभाजीनगर येथे महामार्ग पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.