पुरुष नसबंदीचं प्रमाण नक्की किती? महाराष्ट्रातील या जिल्ह्यात इतक्या पुरुषांनी केली नसबंदी
गडचिरोली : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा भांडाफोड अखेर गुरुवारी (दि.24) झाला. पंचायत समिती एटापल्लीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत विशेष तपासणी समितीच्या चौकशीअंती तिघांकडे वैध नोंदणीपत्र न आढळल्याने प्रशासनाद्वारे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये राकेश गौर मंडल, दुलाल सिकदार व सुनीता मंडल यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात बोगस डॉक्टरांची शोधमोहिमेअंतर्गत एटापल्ली आरोग्य विभागांतर्गत तालुक्यातील 22 संशयित बोगस डॉक्टरांची यादी जाहीर केली होती. संबंधितांना कागदपत्रे पडताळणीसाठी आमंत्रित करत शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पंचायत समिती सभागृहात गट विकास अधिकारी व बोगस डॉक्टर तपासणी समितीचे अध्यक्ष डॉ. आदिनाथ आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण सभा घेण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व समिती सचिव डॉ. भूषण चौधरी, विस्तार अधिकारी (आरोग्य) देवेंद्र नगराळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मडावी, डॉ. राजू स्वामी, तालुका कीटकशास्त्रज्ञ श्रावण राठोड, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक आरती कोरेत आदी उपस्थित होते. या बैठकीत 22 संशयित डॉक्टरांपैकी 11 जणांनी उपस्थिती दर्शवली.
त्यांची शैक्षणिक, वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली असता केवळ एका व्यक्तीकडे बीएएमएसची अधिकृत पदवी असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला संबंधित पॅथीमध्येच वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले गेले. मात्र, उर्वरित डॉक्टरांमध्ये अनेकांकडे केवळ डिप्लोमा, अपूर्ण शिक्षण किंवा खोटी कागदपत्रे असल्याचे उघड झाले. यात दुलाल सिकदार, राकेश मंडल, सुनीला मंडल यांच्याकडे वैध नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.
कारवाईकडे लागल्या नजरा
आरोग्य विभागाने तालुक्यातील 3 बोगस डॉक्टरांविरोधात तातडीने कारवाई करत संबंधित पोलिस विभागात फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. या डॉक्टरांवर गरोदर मातेला चुकीचे औषध देणे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून शासकीय कामात अडथळा आणणे, आणि बेकायदेशीर औषधोपचार करणे यांसारख्या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. आता सर्वांच्या नजरा पोलिस विभागाच्या पावलाकडे लागल्या आहेत. या डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या कारवाईमुळे तालुक्यातील इतर बोगस डॉक्टरांचेही धाबे दणाणले असून, अनेकांनी स्वतःहून वैद्यकीय व्यवसाय थांबवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
दुर्गम भागांतील गरजूंच्या उपचारासाठी आम्ही प्रयत्नशील
दुर्गम भागांतील गरजूंना योग्य उपचारासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. पण, दुर्दैवाने रुग्ण बोगस डॉक्टर रुग्णांपर्यंत पोहोचून चुकीचे निदान व उपचार करतात. त्यामुळे गर्भवती माता, मलेरियाग्रस्त रुग्ण किंवा इतर गंभीर आजार असलेल्या लोकांचे अनावश्यक बळी जातात. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आम्ही ठोस पावले उचलत बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.
– डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली.