...तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र
गडचिरोली : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेत एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्यांसह शासकीय नोकरी, चारचाकी वाहन असलेल्या भगिनींना बाद करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याअंतर्गत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पडताळणी केली जात आहे. या पडताळणीअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल २५ हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत.
बाद करण्यात आलेल्या 25 हजार महिलांमध्ये जवळपास १९२९ लाभार्थींचे या योजनेअंतर्गत अनुदान कायमचे बंद करण्यात आले आहे. तर जवळपास ६५१ बहिणींनी स्वतःहून अर्ज सादर करत या योजनेतून माघार घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर होताच राज्यभरासह जिल्ह्यातीलही अनेक महिलांनी सर्व अटींकडे दुर्लक्ष करत अर्ज सादर केले होते. प्रारंभी शासनानेही याकडे गांभीर्याने न घेता सर्वच अर्ज पात्र करत योजनेचा लाभ दिला. त्यानंतर मात्र, अनेक महिलांनी शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, शासनाने अनेक निकष लावत अर्जाची तपासणी सुरू करून निकषांची पूर्तता न करणाऱ्या बहिणींचे नावे वगळून त्यांना योजनेतून बाद करण्यास सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यात २.६३ लाख महिलांनी अर्ज सादर केले होते. यातील २.६२ लाख अर्ज ग्राह्य ठरले होते.
जिल्ह्यात लाडक्या भावांद्वारे योजनेचा लाभ नाही
शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच लाभ दिला जातो. पण, योजनेबाबतची फसवणूक महाराष्ट्रात उघडकीस आली आहे. अनेक पुरुषांनी महिलांचे आयडी तयार करत योजनेचा लाभ घेतल्याची राज्यातील अनेक जिल्ह्यात नोंद करण्यात आली. विभागाला याबाबत माहिती मिळताच असे सर्व अर्ज रद्द करण्यात आले. मात्र, आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात अशा लाडक्या भावांनी योजनेचा लाभ घेतला नसल्याची माहिती विभागाने दिली आहे.
श्रीमंत लाडक्या बहिणीही योजनेत
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करताना निकष न तपासता मंजूर केले होते. यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडल्याने प्रशासनाकडून लाभार्थ्यांची यादी युद्धपातळीवर तपासणी जात आहे. तपासणीत अनेक बोगस अर्ज समोर आले आहेत. यामध्ये दुहेरी योजनाचा लाभ घेणे, नोकरदार कुटुंबातील महिलांद्वारे लाभ एवढेच नव्हे तर खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांसह अनेक श्रीमंत लाडक्या बहिणींनीही या योजनेचा लाभघेतल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येणार असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या बहिणींची संख्या आणखी घटण्याची चिन्हे आहेत.