अमरावतीचे 55 पर्यटक पहलगाम येथे सुखरूप
अमरावती : काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांना लक्ष्य केले. पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (दि. 22) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यावेळी पहलगामच्या परिसरात अमरावतीचे सुमारे 55 पर्यटक वेगवेगळ्या गटांमध्ये होते. हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत.
अमरावतीतील काही कुटुंबातील सदस्य जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी ते पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले. तेथे ते हसत-खेळत पहलगामच्या वातावरणात हरवले होते. त्यांनी तेथे व्हिडिओ, फोटो काढले. या कुटुंबियांमध्ये सर्वच वयोगटातील लोकांचा समावेश होता. काही वेळानंतर ते तिथून निघाले आणि काही क्षणातच तेथे दहशतवादी हल्ला झाला. सुखरुपस्थळी पोहचले होते. सध्या ते श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत. काही पर्यटक श्रीनगर आणि पहलगाम येथील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.
दरम्यान, अमरावतीवरून गेलेल्या 55 पर्यटकांशी संपर्क करण्यात आला आहे. सर्व पर्यटक हे सुखरुप आहेत. परंतु, श्रीनगर ते दिल्ली रस्ता बंद असल्याने त्यांना विमानद्वारे आणले जाणार आहे, अशी माहिती अमरावतीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी दिली.
बहुतांश पर्यटकांशी संपर्क
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटक अडकले होते. त्यातील बहुतांश पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सर्वतोपरी मदत व्हावी, याकरिता माझी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानुसार, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. नागरिकांना विनंती आहे की, जर आपले आप्त अडकले असतील, तर आपण त्वरित दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा व माहिती द्यावी. नागरिकांच्या सेवा व सुरक्षेसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा तत्पर आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.