
बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : बारामती शहरात दिवसभरात बारामती शहर पोलिसांकडून सहा अल्पवयीन मुले बालसुधारगृहात दाखल करण्यात आली आहेत.
दोन अल्पवयीन मुली इयत्ता ८ वी व दहावीमध्ये शिकणाऱ्या घरांमधून वारंवार न सांगता निघून जातात. आई-वडील त्यांना इतर मुलांशी बोलतात म्हणून व घरी उशिरा येतात म्हणून रागवतात. या दोन्ही मुलींना रागावणे आवडत नाही. सदर दोन्ही मुली यापूर्वी सुद्धा निघून गेल्या होत्या. परत त्यांना समजावून आई-वडिलांकडे पाठवले होते.
शनिवारी (दि ८) रात्रीसुद्धा या अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्या. रात्रभर एका मंदिरांमध्ये राहिल्या आज (दि ९) त्या बारामती शहर पोलिसांना माळेगाव(ता. बारामती) परिसरातील एका शेतकऱ्याच्या उसामध्ये त्या लपलेल्या मिळून आल्या. त्यांना पोलीस स्टेशनला आणून आई-वडिलांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी आई-वडिलांकडे जाण्यास सपशेल नकार दिला. त्यामुळे या अल्पवयीन मुली वारंवार घरातून निघून गेल्याने त्यांना धोका होऊ शकतो म्हणून बाल कल्याण समिती ला पत्र लिहून सदर मुलींना बालसुधारगृहात ठेवण्याबाबत आदेश केले व त्यांच्या आदेशाने त्यांना प्रेरणा सुधारगृहात दाखल करण्यात आले.
तसेच एक मुलगा अडीच वर्षाचा, एक मुलगा तीन वर्षाचा एक मुलगा पाच वर्षाचा अशी तीन भावंडे काही दिवसापूर्वी बारामती रेल्वे परिसरात भिक मागून खात असताना मिळून आले. सदर मुलांची आई त्यांना सोडून गेलेली आहे. तसेच वडील दारूच्या व्यसनी आहेत, त्या मुलांकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यांना इतर कोणीही नातेवाईक नाही.
आज ती मुले परत रेल्वे स्टेशन परिसरात लोकांना भीक मागून खाताना मिळाली. त्यांना त्यांच्या वडिलांकडे देणे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यांनासुद्धा बाल कल्याण समितीच्या आदेशाने सोफिया बालसुधारगृह ससून रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले.
तसेच एक तामिळी बोलणारा मुलगा वय चार वर्ष एसटी स्टँड परिसरात लोकांच्या खिशामध्ये हात घालून मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत असताना मिळून आला. सदर मुलाला सुद्धा मराठी भाषा येत नाही. सदर मुलगा सुद्धा वाममार्गाला जाण्याची शक्यता असल्याने त्यालासुद्धा सोफिया बालसुधारगृहात दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस हवालदार जगताप पोलीस, नाईक कोळेकर तसेच पोलीस शिपाई देवकर, महिला पोलीस शिपाई गोरड, पोलीस शिपाई गोरे यांनी केली.