
कराड आगारातील ६६ एसटी बस फेऱ्या दोन दिवस रद्द
कराड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थेमुळे कराड आगारातील तब्बल ६६ एसटी बसच्या फेऱ्या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. निवडणूक कामासाठी बस उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवासी वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होणार आहे.
कराड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२ आणि पंचायत समितीच्या २४ गणांसाठी एकूण ४८६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २ हजार १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अंतिम म्हणजेच तिसरे प्रशिक्षण गुरुवार (दि. ६) रोजी सकाळी ९ वाजता शासकीय धान्य गोदाम, कराड येथे होणार आहे.
मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी एकूण ९२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ६६ एसटी बस, १८ मिनी बस आणि ८ जीपचा समावेश आहे. निवडणूक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या या बसेस कराड आगारातून उपलब्ध करून देण्यात आल्याने नियमित प्रवासी फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणुकीसाठी ४८६ मतदान यंत्रांसह १० टक्के राखीव म्हणून ५० यंत्रे, अशी एकूण ५३६ मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली असून प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
निवडणुकीसाठी बसेसचा केला जाणार वापर
लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस महत्त्वाची भूमिका बजावतात. यंदाही हीच परंपरा कायम राहिली असून, निवडणूक कर्तव्यामुळे दोन दिवस प्रवासी सेवेवर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी एसटी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कराड आगार व्यवस्थापकांनी केले आहे.