
काय आहे सूर्यघर योजना
अमरावती: घरांच्या छतांवर बसवलेल्या सौर पॅनेलमधून जिल्ह्यात तब्बल ७८ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. आतापर्यंत १९ हजार ३४९ ग्राहकांनी ‘पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना’चा लाभ घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्यात अक्षय ऊर्जेचा वापर झपाट्याने वाढत आहे. आगामी काळात हा आकडा ५० हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘पंतप्रधान सूर्य घरः मुफ्त बिजली योजना’ ही भारतातील घरांना मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट असलेली एक सरकारी योजना आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, घरांना त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा आजपर्यंत जिल्ह्यातील १९ हजार ३४९ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यात आजमितीला ७८ मेगा वॅट वीज निर्मिती होत आहे.
कसा होणार फायदा
या अनुदानात सौर पॅनेलच्या किमतीच्या ४० टक्क्यापर्यंत रक्कम समाविष्ट असेल. या योजनेचा भारतातील १ कोटी कुटुंबांना फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तर अमरावती जिल्ह्यात २०२६ च्या अखेरपर्यंत तब्बल ५० हजार ग्राहक तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. घरच्या रूपटॉपवर सोलर प्लांट बसविण्यासाठी तीन टप्पे दिले आहेत. क्षमतेनुसार सोलर प्लांट बसविता येतो. एकीकडे केंद्र तर दुसरीकडे राज्य सरकारही या दिशेने प्रयत्न करीत आहे. द्रारिद्य रेषेखालील बीपीएल व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घरांच्या छतांवर सोलर रूफटॉप बसवून त्यांना पुढील २५ वर्षे मोफत वीज दिली जाणार आहे. महावितरण कंपनीने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजनेची (स्मार्ट) अंमलबजावणी सुरू केली आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी ६५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ५ लाख ग्राहकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेचा उद्देश १.५४ लाख बीपीएल ग्राहकांचे वीज बिल पूर्णपणे समाप्त करणे हा आहे. तसेच महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ३.४५ लाख ग्राहकांनाही याचा लाभ होणार आहे.
७५ हजार कोटींची बचत
जिल्ह्यात आजपर्यंत १९ हजार ३४९ ग्राहक असून, या योजनेद्वारे आपल्या घराच्या टेरेसवर वीज निर्माण करीत आहे. तसेच या योजनेमुळे सरकारचे वीज खर्चात दरवर्षी ७५ हजार कोटी रुपये वाचणार असून, ग्राहकांचे वीज बिल शून्य ते 10 टक्क्यांवर आले.
घरांसाठी रूफटॉप सोलर प्लांट क्षमता
| मासिक वापर | सोलर प्लांट क्षमता | अनुदान |
| ०-१५० | १-२ किलोवॅट | ३००००ते ६०००० रु. |
| १५०-३०० | २-३ किलोवॅट | ६०००० ते ७८००० रु. |
| ३०० पेक्षा जास्त | ३ किलोवॅटपेक्षा जास्त | ७८,००० |
असे आहेत योजनेचे फायदे
८ वीज बिलांच्या वितेतून मुक्तता मिळाली घरी सौर पॅनेल बसवल्याने आम्हाला वीज बिलांच्या वितेतून मुक्तता मिळाली आहे. आमचे ८ जणांचे कुटुंब आहे. घरी सौर पॅनेल बसवल्यानंतर, आमचे वीज बिल जवळजवळ शून्यावर आले आहे. तर महावितरण कंपनी आम्ही निर्माण केलेली वीज साठवत आहे – अमित वानखडे, ग्राहक, अमरावती