शिक्रापूर : शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पिकअपच्या धडकेने अपघात (Accident in Shikrapur) होण्याच्या घटना घडत आहेत. त्यात नुकतेच एका दाम्पत्याला पिकअपची धडक बसून अपघात झाला. यामध्ये वैभव विजय साबळे व श्रद्धा वैभव साबळे हे दाम्पत्य जखमी झाले. तर यामध्ये त्यांची चार वर्षांची मुलगी प्राप्ती वैभव साबळे हिचा मृत्यू झाला.
वैभव साबळे हे मुखई (ता.शिरुर) येथील कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व महाविद्यालात प्राध्यापक आहेत. ते त्यांची पत्नी व मुलीसह दुचाकीने (एमएच १४ जीजे ९७७६) पाबळ बाजूने शिक्रापूर बाजूकडे येत असताना भरधाव वेगाने जाणारी (एमएच १२ एफडी ९७०७) या पिकअपची साबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात प्राध्यापक वैभव विजय साबळे, श्रद्धा वैभव साबळे तसेच त्यांची चार वर्षीय बालिका प्राप्ती वैभव साबळे हे तिघे जखमी झाले. तर पिकअप चालक पिकअप घेऊन पाबळच्या दिशेने पळून गेला.
यावेळी नागरिकांनी जखमींना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान प्राप्ती वैभव साबळे (वय ४, रा. साईपार्क सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) या बालिकेचा मृत्यू झाला. तर प्रा. वैभव विजय साबळे व श्रद्धा वैभव साबळे (दोघे रा. साईपार्क सोसायटी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गणराया प्लाझा, मुळेवाडी मंचर ता. आंबेगाव जि. पुणे) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.