चाकण : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी सकाळी जयहिंद हॉस्पिटलसमोर एका चारचाकी वाहनाचे पुढील चाक रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात अडकल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यात आले, मात्र या प्रकारामुळे रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे.
धोका वाढवणारे खड्डे व वाहून गेलेले कडे
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. यंदा सततच्या पावसामुळे रस्त्यावरील व कडेला असलेल्या खड्ड्यांची खोली अधिक वाढली आहे. त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होतो. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेला भाग पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला असून, दिशादर्शक किंवा कोणतीही चेतावणी फलक नसल्याने वाहनचालक गोंधळून किरकोळ अपघाताला सामोरे जात आहेत.
प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), नगरपरिषद आणि MIDC प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. रोजच्या रोज अपघाताचे प्रसंग घडत आहेत, पण संबंधित विभागाचे अधिकारी प्रतिसाद देत नाहीत.”
तातडीची मागणी आणि आंदोलनाचा इशारा
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, खड्डे बुजवून रस्त्याच्या कडेला मुरूम टाकावे अशी मागणी केली आहे. अन्यथा वाहतूक अडचणींमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “जर तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असेही नागरिकांनी स्पष्ट केले.
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठजवळ टेम्पो पलटी
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातास पाठीमागून आलेल्या इंडिका कारने टेम्पोला अचानक कट मारणे हे कारण असल्याचे चालक शरद वामन गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी सांगितले. जखमी भाविकांना अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने इतर वाहनांद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल टाके यांनी दिली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेली इंडिका कार थांबली नाही आणि चालक पळून गेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.