तोल जाऊन रेल्वेखाली आल्याने पायांचा चेंदामेंदा
अमळनेर : रेल्वेत जागा मिळवण्यासाठीची धावपळ चांलीच बेतली आहे. या धावपळीत तोल जाऊन रेल्वेखाली सापडलेलया प्रवाशाच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला आहे. ही घटना अमळनेर रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास फलाट क्रमांक एकवर घडली.
हेदेखील वाचा : कौटुंबिक समस्या आत्महत्याचे सर्वात मोठे कारण; धक्कादायक आकडेवारी आली समोर
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारी गांधीधाम एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत होती. यावेळी सुरतला जाण्यासाठी निघालेला प्रवाशी विकास अभिमन्यू पाटील (रा.झाडी) हे जागा मिळवण्यासाठी धावपळ करत प्लॅटफॉर्म वरून गाडीत चढत होते. यावेळी अचानक तोल गेल्याने ते गाडीच्या चाकाखाली आले. चाकाखाली आल्याने त्यांच्या दोन्ही पायांच्या पंजांचा चंदामेंदा झाला. यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे असलेले रजनीकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलून त्यांना फलाटावर ठेवले.
तातडीने आरपीएफ व जीआरपीएफ जवांनाना संपर्क साधला. पोलिस व रेल्वे कर्मचारी यांनी विकास यांना तात्काळ उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तपास लोहमार्ग पोलिस नाईक दिनकर कोळी हे करत आहेत.
हेदेखील वाचा : ‘तेव्हा मी थरथर कापते…,’ कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप