'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; मनिषा कायंदेंचा सभागृहात गंभीर आरोप
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक परंपरा मानली जाते. लाखो भाविक आणि दिंड्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधानसभेत एक गंभीर दावा करत खळबळ उडवून दिली आहे. काही अर्बन नक्षलवादी घटक वारकऱ्यांच्या वेशात वारीत सहभागी होत असल्याचा ठोस पुरावा समोर आल्याचा त्यांनी दावा केला आहे. हे आरोप त्यांनी सभागृहात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मांडले.
Narayan Rane : ‘मातोश्री’चा एक भाग राज ठाकरेंना देणार का? नारायण राणे उद्धव ठाकरेंना असं का म्हणाले?
मनिषा कायंदेंनी केलेले आरोप काय?
कायंदे म्हणाल्या की, “हे लोक देवधर्म मानत नाहीत हे त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. पण हिंदू धर्म आणि वारीबाबत अपप्रचार पसरवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पर्यावरण दिंडी, संविधान दिंडी अशा नावाखाली काही संघटना पथनाट्य सादर करतात, मात्र यामागे हेतू वेगळे आहेत.”
त्यांनी सासवड परिसरात अशा लोकांची उपस्थिती असल्याचे नमूद केले. “त्यांनी दिलेला क्युआर कोड ब्लॅकलिस्टेड असल्याचे लक्षात आलं आहे. अशा प्रकारे वारीचा गैरफायदा घेतला जातोय, याची गंभीर दखल घेतली पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं.
तसंच, 2010-11 पासून काही व्यक्तींवर गुन्हे दाखल असूनही ते वारकरी वेशात सहभागी होत असल्याचा आरोप करत कायंदेंनी अंनिसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “संविधानाच्या नावावर फेक नरेटिव्ह पसरवणारे हे लोक नाहीत ना?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
कायंदेंच्या या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. “अशा लोकांकडे फार लक्ष देऊ नका, हे नेहमी पक्ष बदलत असतात, त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.