'मातोश्री'चा एक भाग राज ठाकरेंना देणार का? नारायण राणे उद्धव ठाकरेंना असं का म्हणाले?
भाजप खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत. कारण राज ठाकरे पक्षात आले, तर उद्धव ठाकरे यांचं राजकारणच संपुष्टात येईल, असा दावा त्यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.
नारायण राणे पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे कधी मातोश्रीचा एक हिस्सा राज ठाकरेंना देणार आहेत का?” त्याचबरोबर ठाकरे कुटुंबाने आतापर्यंत कुटुंब म्हणून किती सदस्यांना जवळ घेतलं, असा सवाल त्यांनी केला आहे.
राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यांना पक्ष सोडायला भाग पाडल्याचा आरोपही राणेंनी केला. “राज ठाकरेंना पक्ष सोडायचा नव्हता, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना छळलं,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
शिवसेनेच्या ऐतिहासिक वाटचालीवर भाष्य करताना नारायण राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी ४० वर्षात जी शिवसेना उभी केली, ती उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली. मराठी माणसाला दिशा देणारी ही संघटना उद्धव ठाकरेंच्या हातू कमकुवत झाली.”
मुंबईत मराठी टक्का घटत आहे, त्यावर नारायण राणे यांनी चिंता व्यक्त केली आहे. “1960 मध्ये मुंबईत मराठी लोकसंख्या 60 टक्के होती, पण आज ती 18 टक्क्यांवर आली आहे. याला जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं?” असा थेट सवाल त्यांनी केला.
त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाचं शिक्षण इंग्रजी माध्यमात केल्याची आठवण करून देत, “त्यांना आज मराठी आठवतीय, पण जेव्हा ते शरद पवार आणि सोनिया गांधींसोबत होते, तेव्हा मराठी आठवली का नाही?” असा सवाल त्यांनी केला.
अलीकडेच मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप करत, “राणेंनी पद मिळवण्यासाठी मारामाऱ्या, खून केले” असं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, “भरत गोगावले कोण?” मी ओळखत नसल्याचं त्यांनी म्हटलं.