
अधिवेशनापूर्वी परिवहनमंत्र्यांचा 'एसटी'ला झटका
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज स्थगित झाल्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेशपेठ येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकावर धडक तपासणी केली. नेहमीच्या ‘सोलापूर पॅटर्न’प्रमाणेच यावेळीही त्यांनी कोणतीही सूचना न देता अचानक भेट देत कॅन्टीनपासून शौचालयापर्यंत सर्व सुविधा तपासल्या. यावेळी कॅन्टीनची दयनीय अवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. तपासणीदरम्यान एसटी कॅन्टीनमध्ये गंजलेली भांडी, मोडकी फर्निचर, खाद्यपदार्थांची निकृष्ट गुणवत्ता आणि तुलनेने जास्त दर होते.
तसेच कॅन्टीन परिसरातील अस्वच्छता पाहून सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॅन्टीनचे परवानाधारक गुरुप्रीत चोरडा यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. काही दिवसांत कॅन्टीनचा कायापालट करा, अन्यथा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. परिवहनमंत्र्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृह, उपहारगृह, चौकशी कक्ष, प्रवासी प्रतीक्षालय, चालक-वाहक विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष यासह सर्व महत्त्वाच्या विभागांची पाहणी केली. प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींविषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेतली.
यावेळी त्यांनी नागपूर विभाग नियंत्रक विनोद चवरे यांना निर्देश दिले की, हिवाळी अधिवेशनामुळे फक्त दिखाऊ स्वच्छता नको. ३६५ दिवस प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गणेशपेठ बसस्थानकातही झपाट्याने स्वच्छता करण्यात आली. मात्र, ही तत्परता फक्त अधिवेशनापुरतीच, की वर्षभर टिकेल? असा प्रश्न प्रवासी समुदायातून उपस्थित केला जात आहे.
हिंगणा बसस्थानकाची पाहणी
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंगणा बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. सोबतच महिलांचे हिरकणी कक्ष व बसस्थानकांच्या सोयीसुविधांची माहिती घेतली. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रादेशिक व्यवस्थापक माधव कुसेकर, विभाग नियंत्रक विनोद चौरे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, अभियंत्रचालक नेवारे, इमामवाडा आगार व्यवस्थापक इम्रान खान व नागरिक उपस्थित होते.
सोलापुरातील आगार व्यवस्थापक निलंबित
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परिवहनमंत्री सरनाईक यांनी सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन शौचालय व पाणपोईतील गैरसोयीमुळे आगार व्यवस्थापकांना निलंबित केले होते. त्यानंतर राज्यभरातील आगारा व्यवस्थापकांनी तातडीने स्वच्छता व पायाभूत सुविधांचे काम हाती घेतले.
हेदेखील वाचा : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप आधारित कंपन्यावर गुन्हे दाखल, प्रताप सरनाईक यांचा निर्णय