
होळीनिमित्त रेल्वेनंतर आता कोकणात एसटीच्या फेऱ्याही वाढणार; 198 ज्यादा फेऱ्यांचे नियोजन
गुहागर : मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना शिमगोत्सव आणि होळीची चाहूल लागली की गावी जाण्याची ओढ अनावर होते. गावोगावी निघणाऱ्या पालख्या, देवभेटी, जत्रा आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने (एसटी) यंदाही विशेष नियोजन हाती घेतले असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड या विभागांतून या जादा फेऱ्या धावणार आहेत. होळीच्या काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभाग : ७९ फेऱ्या, मुंबई विभाग : ६२ फेऱ्या, पालघर विभाग : २४ फेऱ्या (पूर्णपणे गट आरक्षणासाठी), रत्नागिरी विभाग : २१ फेऱ्या, रायगड विभाग : ३३ फेऱ्या (आरक्षित प्रवाशांसाठी), एकूण १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी उपलब्ध असतील, तर ५७ फेऱ्या गट आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गावाकडील मंडळे, कुटुंबे किंवा मित्रमंडळींच्या गटांना सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी गट आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. गावोगावी होणाऱ्या होळ्या, पालख्या, पारंपरिक नृत्य, देवभेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरणात उत्साह असतो. त्यामुळे दरवर्षी हजारो कोकणी बांधव होळीच्या निमित्ताने गावी परततात. एसटीच्या या विशेष मोहिमेमुळे संभाव्य गैरसोय टळणार असून, प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. शिमगोत्सवाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ‘लालपरी’ पुन्हा एकदा कोकणाच्या दिशेने सज्ज झाली आहे.
अतिरिक्त बसगाड्या सज्ज ठेवणार
एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी सर्वाधिक प्रवासी कोकणाकडे रवाना होण्याची शक्यता आहे. २८ फेब्रुवारी रोजी ९१ फेऱ्या, १ मार्च रोजी ५९ फेऱ्या होतील. या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त बसगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार आणखी फेऱ्या वाढवण्याची तयारीही ठेवण्यात आल्याचे समजते.
सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर प्रवासावर भर
होळीच्या काळात खासगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, रेल्वे तिकिटांची कमतरता लक्षात घेता एसटी हा सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि परवडणारा पर्याय ठरतो. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान आणि सुलभ व्हावा यासाठी तांत्रिक तपासणी, चालक-वाहकांचे नियोजन आणि नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार