
बिबटयांना पकडा म्हणजे आम्ही अंगणात खेळू शकू, देवठाणच्या विद्यार्थ्यांची भाबडी विनंती
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसरात बिबट्यांची संख्या अचानक वाढल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. “खूप बिबटे झालेत. ते लहान मुलांवर हल्ला करतात. आम्हाला खूप भीती वाटते. घरचे आम्हाला बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत. तुम्ही सगळे बिबटे पकडून पिंजऱ्यात टाका, म्हणजे आम्ही अंगणात सुरक्षितपणे खेळू शकू आणि छोट्या मुलांचे जीव धोक्यात जाणार नाहीत,” अशा शब्दांत मुलांनी आपली भावना व्यक्त केली. जंगलातून मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यांनी मुलांचे हक्काचे खेळण्याचे अंगण व्यापून टाकल्याचा अनुभव त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडला. मुलांची ही परिस्थिती पाहून अधिकारीही चिंतित झाले.
देवठाण परिसरातील वाढत्या बिबट्या-उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या देवठाण शाळेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या शंकांचे निरसन करताना अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांना सोप्या अशा भाषेत उत्तरे दिली.
अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देत सांगितले की, योग्य सावधगिरी बाळगल्यास बिबट्यांचे हल्ले टाळता येऊ शकतात. अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरात निर्माण झालेली भीती मुलांच्या वागण्यात स्पष्ट दिसत होती. या भीतीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षित वर्तनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वनपाल देविदास जाधव, विठ्ठल पारधी, वनरक्षक अंकुश काकडे आणि एकनाथ पारेकर यांनी मुलांशी सविस्तर चर्चा केली.
BMC Election : महापालिका निवडणुका मार्चनंतर? मुंबई, ठाणे, पुण्यासह 28 मनपांच्या निवडणुका होणार?
वनपाल पारधी यांनी स्पष्ट केले की, जंगलाची तोड, जंगलातील आग आणि बिबट्याला नैसर्गिक भक्ष्य न मिळणे या कारणांमुळे ते मानवी वस्तीत येतात. माणसांपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव असला तरी आपण निष्काळजीपणा केला तर धोका वाढतो. त्यामुळे सुरक्षा नियम पाळणे अत्यावश्यक आहे.