
नेवासेतील राजकारणामुळे 'या' नेत्याच्या हातावरील शिवबंधनाची गाठ ढिली होऊ लागली?
सुहास देशपांडे/ अहिल्यानगर: नेवासे नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्याखालीच लढवणार असल्याची घोषणा उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) नेते आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केली. या घोषणेमुळे मशाल चिन्ह नेवासे तालुक्यातून जवळपास बाद होण्याची शक्यता बळावली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उबाठामधील मोठ्या प्रमाणातील गळती थांबण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. जिल्ह्यात उबाठाचे प्रमुख नेते म्हणून गडाख यांच्याकडे पाहिले जात असले, तरी संघटना बांधणी किंवा जिल्हास्तरीय संपर्क यात त्यांची अपेक्षित सक्रियता अनेकांना जाणवली नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गडाख यांनी स्वतःच्या नेतृत्त्वाखालील क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवून २०१४ मधील पराभवाचा बदला घेतला. नंतर महाविकास आघाडीत शिवसेनेला मिळालेल्या मंत्रिपदांपैकी एक गडाख यांच्या वाट्याला आले. त्यानंतर मातोश्री येथे त्यांनी शिवबंधन स्वीकारले आणि उबाठाच्या नेतृत्वात त्यांची नोंद झाली. मात्र नेवासे वगळता जिल्ह्यात त्यांचा संघटनात्मक संपर्क मर्यादितच राहिला.
जिल्ह्यात पक्षावरून अनेकजण बाहेर पडत असताना गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न दिसून आले नाहीत. त्यांनी विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढवली असली तरी पराभवानंतर या चिन्हापासून त्यांनी जवळपास अंतर घेतल्यासारखे दिसले. आज सोनई येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी नेवासे नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून लढवण्याचा निर्णय अधिकृत केला. या मेळाव्यात उबाठाचे तालुकाप्रमुख हजर होते; मात्र जिल्हाप्रमुखांना निमंत्रण होते की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढणार असल्याने मशाल चिन्हाचा वापर नसेल. उद्धव ठाकरे गावोगावी पक्षाची भूमिका पोहोचवण्याचे आवाहन करत असताना, नेवासेमध्येच चिन्ह न दिसणे निष्ठावंत उबाठा शिवसैनिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. तसेच यामुळे शिवसैनिक अस्वस्थ होत आहेत.
आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर…; जयकुमार गोरेंचा पवारांना इशारा
गडाख यांच्या घोषणेवर उबाठाचे स्थानिक व राज्यस्तरीय नेते कितपत सहमत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेते यावर विचार करतील असे सांगितले. त्यामुळे उबाठा गडाख यांच्या भूमिकेसोबत जाणार की मशाल टिकवणार, हे पाहणे पुढील काळात महत्वाचे ठरणार आहे.