प्रदूषणाने पावसालाही रोखले? ढगांच्या निर्मिती प्रक्रियेत थेट...; समोर आला धक्कादायक खुलासा

समुद्रावरील प्रदूषित हवेच्या थरात ढगनिर्मितीस कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म कणांचे (सीसीएन) प्रमाण प्रति घनसेंटीमीटर एक हजारपेक्षा अधिक असल्याचे आढळले.
प्रदूषणामुळे मंदावली ढगांमधील पावसाची निर्मिती
वातावरणीय प्रदूषण (फोटो- ai gemini/ सोशल मिडिया) 'क्लाउड एरोसोल इंटरॅक्शन अँड प्रिसिपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट' (कॅपेक्स) अंतर्गत हे संशोधन
Published on: 
Updated on: 
  • प्रदूषणामुळे मंदावली ढगांमधील पावसाची निर्मिती

  • बंगालच्या उपसागरातील ढगांवर आयआयटीएम पुणेच्या शास्त्रज्ञांचे संशोधन

  • प्रदूषित ढगांमध्ये बर्फकणांची निर्मिती वाढत असल्याचे निरीक्षण

सुनयना सोनवणे / Pollution: वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम केवळ हवेच्या गुणवत्तेवरच नव्हे, तर ढगांची रचना आणि पावसाच्या निर्मिती प्रक्रियेवरही होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी बंगालच्या उपसागरावरील खोल संवहनी ढगांचा अभ्यास करून प्रदूषणामुळे ढगांमधील पाण्याच्या थेंबांची वाढ मंदावते.

तर बर्फकणांच्या निर्मितीला चालना मिळते, असे निरीक्षण नोंदविले आहे. प्रदूषित ढगांमध्ये स्वच्छ वातावरणातील ढगांच्या तुलनेत द्रवरूप पाण्याचे प्रमाण २० टक्के, तर बर्फाच्या पाण्याचे प्रमाण ४३ टक्क्यांनी अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहे.

आयआयटीएमच्या 'क्लाउड एरोसोल इंटरॅक्शन अँड प्रिसिपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट' (कॅपेक्स) अंतर्गत हे संशोधन करण्यात आले. सचिन पटाडे, केदार तहसीलदार, अपर्णा मनाप्पिल्ली, सोनाली शेते, गायत्री कुलकर्णी, नीलम मालप, पी. मुरुगवेल आणि थारा प्रभाकरन या शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग होता. हे संशोधन ' ॲटमॉस्फेरिक एन्व्हायर्नमेंट' या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Aurangabad Bench High Court : दिवाळीआधी सीजी पॉवर, गुडइयरला मोठा दिलासा! कारखाने बंद करण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

या अभ्यासासाठी बंगालच्या उपसागरावरील ढगांची विमानाद्वारे प्रत्यक्ष निरीक्षणे घेण्यात आली. तसेच, उच्च क्षमतेच्या संगणकीय प्रारूपांच्या साहाय्याने ढगांमधील सूक्ष्म भौतिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यात आला. समुद्रावरील प्रदूषित हवेच्या थरात ढगनिर्मितीस कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म कणांचे (सीसीएन) प्रमाण प्रति घनसेंटीमीटर एक हजारपेक्षा अधिक असल्याचे आढळले. खंडीय भागातून समुद्राकडे वाहून आलेल्या प्रदूषक कणांमुळे हे प्रमाण वाढल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

या कणांमुळे ढगांमध्ये मोठ्या संख्येने लहान आकाराचे पाण्याचे थेंब तयार झाले. त्यांचा आकार लहान असल्याने थेंब एकमेकांत मिसळून मोठे होण्याची प्रक्रिया मंदावली. परिणामी, उबदार ढगांमध्ये पावसाचे थेंब तयार होण्यास विलंब झाला. निरीक्षणांमध्ये पर्जन्याच्या आकाराचे बहुतांश कण हे बर्फ आणि पाण्याच्या मिश्र स्वरूपातील 'ग्रॉपेल' (लहान गारांसारखे कण) असल्याचे दिसून आले. तसेच, अपेक्षित बर्फकेंद्रकांच्या तुलनेत प्रत्यक्ष बर्फकणांचे प्रमाण सुमारे शंभरपट अधिक होते. यावरून ढगांमध्ये दुय्यम बर्फनिर्मितीची प्रक्रिया सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले.

संगणकीय प्रारूपांच्या निष्कर्षांनुसार, प्रदूषित ढगांमध्ये बर्फकणांची वाढ, त्यांचे एकत्रीकरण आणि गारांची निर्मिती अधिक वेगाने होते. त्यामुळे ढगांमधील मिश्र अवस्थेतील आणि बर्फाच्या स्वरूपातील प्रक्रिया बळकट होतात. मात्र, पावसाची एकूण निर्मिती तुलनेने कमी होते. समुद्रावरील ढगांमध्ये प्रदूषणाचा पर्जन्य प्रक्रियेवर नेमका कसा परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रक्रियांचा व्यापक निष्कर्ष काढण्यासाठी आणखी प्रत्यक्ष निरीक्षणे आणि संगणकीय अभ्यास आवश्यक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

Q

वायुप्रदूषणाचा ढगांच्या निर्मिती प्रक्रियेवर काय परिणाम होतो?

A

वायुप्रदूषणामुळे ढगांमधील पाण्याच्या थेंबांची वाढ मंदावते. त्यामुळे ढगांची रचना आणि पावसाच्या निर्मिती प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

Q

ढगांवरील प्रदूषणाच्या परिणामांचा अभ्यास कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केला?

A

पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) शास्त्रज्ञांनी बंगालच्या उपसागरावरील खोल संवहनी ढगांचा अभ्यास करून हा निष्कर्ष मांडला.