
फोटो सौजन्य - Social Media
चंद्रपूर येथील इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर राजेश राऊत यांनी ८ नोव्हेंबर रोजी ब्लॉकचे काम करताना चंद्रपूर डाउन लूप लाइनवर रेल्वे रुळांना तडे गेलेले ओळखले. तात्काळ माहिती दिल्यामुळे स्वर्ण जयंती एक्स्प्रेस थांबवून सुरक्षित मार्गाने वळवण्यात आली. त्यांच्या जागरूकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. भुसावळ विभागाचे मालवाहतूक लोकोपायलट एल. जे. चौधरी यांनी ५ नोव्हेंबर रोजी निंभोरा स्टेशनवर तपासणीदरम्यान तिसऱ्या वॅगनचे हँड असेंब्ली तुटून लटकत असल्याचे पाहिले. त्वरित कार्यवाही करत त्यांनी लटकणारा भाग सुरक्षितरीत्या वेगळा करून अपघाताचा धोका कमी केला.
नागपूर विभागातील बल्लारशाह मालवाहतूक रेल्वे व्यवस्थापक रवी वर्मा यांनी ३१ ऑक्टोबर रोजी ड्युटीवर असताना बुटीबोरी यार्डातून जाताना एका वॅगनमधून धूर येताना पाहिला. त्यांनी तातडीने लोको पायलटला आणि कॅरेज-वॅगन कंट्रोलला माहिती देत ट्रेन सुरक्षित थांबवून संभाव्य धोका टाळला. याशिवाय अमरेशकुमार सिंग, संदीप पाटील, मोहनसिंग डागर, डी. के. यादव, नरेंद्र कुंभार, चेतन भालवणकर, महेश उमेश, विक्रम मीना या कर्मचाऱ्यांनाही सुरक्षेतील उल्लेखनीय भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले. मध्य रेल्वेच्या या पुरस्कारामुळे सतर्कता, जबाबदारी आणि रेल्वे सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.