सौजन्य - नवराष्ट्र टीम
विटा हे सुवर्ण शहर म्हणून ओळखले जाते. येथील नगरपरिषदेची निवडणूक कधी नव्हे ती यावेळेस चुरशीने झाली. ५० वर्ष एकाच घराण्याचे वर्चस्व असलेल्या हणमंतराव पाटील यांचे वारसदार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पूर्वाश्रमीचे काॅग्रेस नेते अशोकराव गायकवाड यांनी साथ दिली. आपले पुत्र अजितराव व पुतणे सुमित यांना कमळ चिन्हावर निवडणूकीच्या मैदानात उतरवले. निवडणूकीत आणखीन रंगत वाढली. भाजपाचे प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री, आमदार सुरेख खाडे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली. सदाशिव पाटील गटाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन भ्रमणध्वनी द्वारे मतदारांशी संवाद साधला. पाटील गटातील कार्यकर्त्यांनी बळ देण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर हे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह घेऊन पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूकीच्या मैदानात उतरले. प्रारंभी एकटे वाटलेले नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, आरपीआय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. अन् बाबर गटात चैतन्य पसरले. बाबर गटाला ताकद देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची विटा शहरात सभा झाली. शिवसैनिकांना ताकद दिली. विटा शहर विकासासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. आमदार सुहास बाबर यांना ताकद देण्यासाठी आवाहन केले.
निवडणूकीच्या प्रचारात आश्वासनांचा पाऊस पडला. पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, औद्योगिक वसाहत, क्रीडांगण, महिलांसाठी शौचालय, हे प्रश्न निवडणूक प्रचाराच्या पटलावर आले. नेतेमंडळींनी पुन्हा आश्वासनाचे नवे गाजर दाखवले. मतदानात वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.






