मुंबई : अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हेची हत्या (Umesh Kolhe Murder Case) केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने १५ जुलैपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.
सोशल मीडियावर वादग्रस्त केलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) सात जणांना अटक केली. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास स्वतंत्ररित्या सुरू केला.
त्या सातही आरोपींना गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. ही एक दुर्दैवी घटना आहे. मात्र, त्याला वेगळा रंग दिला जात आहे. यूएपीएअंतर्गत कलम लावताना त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे तपास यंत्रणेकडे नाही. तपासात काही तथ्य आढळून येत नाही. तसे असतानाही सर्व आरोपींवर युएपीए लावण्यात आले आहे.
सर्व आरोपी कोणत्याही बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे भाग आहेत का? अशी विचारणा आरोपीच्यावतीने करण्यात आली. आरोपींना याआधीच काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने कोठडीची गरज नाही, असा दावाही आरोपींकडून करण्यात आला.
त्यांच्या दाव्याला एनआयएकडून तीव्र विरोध करण्यात आला. प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. या टप्प्यावर आम्ही तपासाशी संबंधित गोष्टी उघड करू शकत नाही. आम्हाला तपास करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. याप्रकरणी ७ आरोपी अटकेत आहेत. तर एक फरार असून त्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात त्यांच्याविरोधात पुरावे आहेत. हे निर्दोष नाहीत. याप्रकरणी युएपीएची कलम १६,१८,२० लावण्यात आली आहे.
तसेच हा तपास अमरावतीपुरता मर्यादित नाही, वेळ आल्यावर आवश्यक पुरावे सादर करू, असे एनआयएने युक्तिवाद करताना सांगितले. त्याची दखल घेत न्यायालयाने सातही आरोपींना १५ जुलैपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.