नवी मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू प्रकरणावरुन सरकारवर अद्यापही टिका होत आहे. या दुर्घटनेनंतर, नवी मुंबई परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र (Automatic Weather Station) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून जागेची पाहणी करत तातडीने स्वयंचलित हवामान केंद्राची जागा निश्चित करण्याचे आदेश मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिकांना देण्यात आले आहेत.
[read_also content=”सत्यपाल मलिक राज्यपाल असताना का बोलले नाहीत? पुलवामा दाव्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यावरुन शहांची टिका https://www.navarashtra.com/india/why-didnt-satyapal-malik-speak-when-he-was-governor-shah-criticized-for-questioning-the-credibility-of-the-pulwama-claim-nrps-390425.html”]
खारघरमध्ये दुर्घटनेनंतर हवामान केंद्र सुरु करण्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून (IMD) हालचाली सुरु झाल्या आहेत. या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातुन परिसरातील कमाल आणि किमान तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग इत्यादी बद्दल माहिती मिळणे सोपे होणार आहे. पावसाळ्याच्या आधीच लवकरात लवकर जागा ठरवत स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यासाठी भारतीय हवामान विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जागेच्या पाहणीकरता लवकरच परिसराचे निरीक्षण केले जाणार आहे.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सोहळा खारघर येथे रणरणत्या उन्हात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोहळ्याला 15 श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. तर काही जणांवर अद्यापही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेवरुन सरकार ताशेरे ओढले जात असताना नवी मुंबईत भारतीय हवामान विभागाचे एकही केंद्र नवी मुंबई परिसरात नसल्याची बाब निर्दशनासा आली. त्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खारघरमधील दुर्घटनेच्या वेळी त्या जागेवरील तापमान 41 अंश किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचं निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवलं होतं. मात्र, भारतीय हवामान विभागाचे केंद्र घटनास्थळाच्या परिसरात नसल्याने निश्चित तापमानाचा आकडा सांगण्यात अडचण निर्माण झाली.