apolo team
नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्सचे (Apollo Hospital) चीफ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ चिराग देसाई (Dr. Chirag Desai) यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या एका टीमने भारतामध्ये आजवरचा सर्वाधिक वजनाचा ट्युमर शस्त्रक्रियेमार्फत (Record Of Tumor Operation) काढून टाकून नवा विक्रम रचला. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये (India Book Of Records) झाली आहे.
अतिशय लक्षणीय कामगिरी बजावत या टीमने एका ५६ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या शरीरातून तब्बल ४७ किलो वजनाचा ट्युमर काढून टाकला व तिला नवजीवन मिळवून दिले. हा भारतातील आजवरचा यशस्वीपणे काढून टाकण्यात आलेला सर्वात मोठा नॉन-ओव्हरीयन ट्युमर आहे. देवगढ बारिया येथील रहिवासी असलेली ही महिला सरकारी कर्मचारी असून गेली १८ वर्षे ती या ट्युमरने त्रस्त होती.
[read_also content=”एक मंडप… एक वर… तीन वधू: अलीराजपूरमध्ये अनोखा विवाह; माजी सरपंचाने केले ३ प्रेयसींसोबत लग्न, ६ मुलगे झाले वऱ्हाडी https://www.navarashtra.com/india/unique-wedding-in-alirajpur-former-sarpanch-marries-3-sweethearts-together-6-sons-become-bridesmaids-275371.html”]
चार सर्जन्सचा समावेश असलेल्या, एकूण आठ डॉक्टरांच्या टीमने याच शस्त्रक्रियेदरम्यान ट्युमरव्यतिरिक्त पोटाच्या आतील भिंतींचे टिश्यू व अतिरिक्त त्वचा देखील काढली आणि या सर्वांचे एकूण वजन जवळपास ७ किलो होते. ही शस्त्रक्रिया २७ जानेवारी रोजी पार पडली होती. शस्त्रक्रियेनंतर या महिलेचे वजन ४९ किलोंनी कमी झाले. या महिलेला सरळ उभे राहणे जमत नव्हते त्यामुळे शस्त्रक्रियेच्या आधीचे तिचे वजन मोजणे शक्य झाले नाही. डॉक्टरांच्या टीममध्ये ऑन्को-सर्जन डॉ नितीन सिंघल, ऍनेस्थेटिस्ट डॉ अंकित चौहान, जनरल सर्जन डॉ स्वाती उपाध्याय आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ जय कोठारी यांचा समावेश होता.
शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसकडे एक दावा नोंदवण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् टीमने या दाव्याची काटेकोरपणे पडताळणी, तपासणी केली आणि त्यानंतर या विक्रमला मंजुरी देण्यात आली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये ‘स्ट्रेंज बट ट्रू’ या विभागात या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
डॉ चिराग देसाई यांनी सांगितले, “या रुग्ण महिलेच्या पोटातील ट्युमरमुळे जो ताण निर्माण झाला होता त्यामुळे यकृत, हृदय, फुफ्फुसे, किडन्या आणि गर्भाशय यासारख्या अवयवांच्या मूळ जागा बदलल्या गेल्या होत्या, त्यामुळे या शस्त्रक्रियेत खूप मोठा धोका होता. ट्युमरच्या प्रचंड मोठ्या आकारामुळे सीटी स्कॅन मशीनच्या गॅन्ट्रीला अडथळा येत होता त्यामुळे सीटी स्कॅन करून घेणे देखील खूप अवघड होते. सर्व अडीअडचणींवर मात करून आम्ही ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू शकलो आणि त्यामुळे या रुग्णाला नवजीवन मिळाले याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे.त्यानंतर या यशाची घेतली गेलेली दखल आणि त्याला मिळालेला सन्मान व कौतुक आमच्यासाठी अतिशय उत्साहवर्धक ठरले आहे.”