सातारा : सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या क्षेत्रासाठी ४८ कोटी रुपयांचा आराखडा नगर विकास विभागाने मंजूर केला असून, या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या निधीचा पहिला टप्पा लवकरच नगरपालिकेला प्राप्त होणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात असे नमूद आहे की, शहराच्या हद्दवाढीला समाविष्ट झालेल्या भागासाठी ५१ कोटी रुपयांचा विकास आराखडा सातारा विकास आघाडी तयार केला होता. शाहूनगर विलासपूर संभाजीनगर दरे खुर्द या सर्व भागांना अद्ययावत पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ४८ कोटी रुपयांचे प्रस्ताव सातारा नगरपालिकेने अत्यंत मेहनतीने तयार करून नगर विकास विभागाला सादर केले होते. या सर्व कामांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
गत महिन्यात ५८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळून दहा कोटी रुपयांचा पहिला हप्ता पालिकेला प्राप्त झाला आहे . चैत्र शुद्ध पाडव्याच्या निमित्ताने सातारकर यांनाही विशेष भेट मिळाली असल्याचे उदयनराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.