५०० आश्रमशाळांतील विद्यार्थी गणवेशाविना
मुंबई : राज्यातील सुमारे 500 शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय गणवेश मिळालेला नाही. शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना काही वर्षांपूर्वी शिवलेले गणवेश थेट दिले जात होते. त्यानंतर डीबीटी योजनेंतर्गत पालकांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात होती. मात्र, दोन वर्षांपासून पुन्हा तयार गणवेश देण्याचा निर्णय झाला. पालक आणि विद्यार्थी पहिल्या आठवड्यात तरी गणवेश मिळेल, अशी अपेक्षा करत होते. स्वातंत्र्यदिनापर्यंत गणवेश मिळतील, असेही सांगण्यात आले. पण आजतागायत गणवेशाचा पत्ताच नाही.
अमरावती अपर आयुक्तालयातील शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता, गणवेशाची खरेदी ही टेंडर प्रक्रियेत अडकलेली असून नवीन तारीख ठरलेली नाही, असे उत्तर मिळाले. यावरून मुलांना गणवेश कधी मिळणार, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणात गणवेशाचे महत्त्व असताना, शासन व विभागीय अधिकारी इतके उदासीन का ? असा सवाल पालक आणि सामाजिक संघटनांकडून उपस्थित होत आहे.
शासकीय स्तरावरून राबवल्या जातात टेंडर प्रक्रिया
शासकीय स्तरावरून टेंडर प्रक्रिया राबविल्या जातात. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची योजना आहे. अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. लवकरच मिळतील, अशी अपेक्षा आहे.
– जितेंद्र चौधरी, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.
सध्या शिक्षण बनले अत्यंत गरजेचे
सध्या शिक्षण हे अत्यंत गरजेचे बनले आहे. काही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं तर काही विद्यार्थी याच शिक्षणापासून दूर राहत असल्याचे दिसून आले. भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाद्वारे १ ते १५ जुलै या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात आले. यामध्ये एकूण ३६ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले. त्यात १५ मुले आणि २१ मुलींचा समावेश आहे. तर ३९ बालके ही स्थलांतरित असून, ते शाळा प्रविष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.