फोटो सौजन्य- प्रतिनिधी
पनवेल: पालिका प्रशासनाने आकारलेल्या मालमत्ता करा विरोधात रान पेटवून पालिकेतील सत्त्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेल्या माजी नगरसेविका लीना गरड यांना आगामी विधानसभेच्या निमित्ताने तयारीला लागण्याचे संकेत देण्यात आले असल्याची माहिती गरड समर्थकांकडून देण्यात आली आहे.वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या संकेता मुळे गरड समर्थक कामाला लागले असून, कोणत्याही परस्थितीत पनवेल विधानसभेची निवडणूक जिंकणारच असा विश्वास गरड यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
लोकसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडी नंतर राज्यात महाविकास आघाडीला अनपेक्षित रित्या मोठे यश मिळाले.परिणामी राज्यात लवकरच पार पडणार असलेली विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी कडून लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. पनवेल विधानसभा मतदार संघ देखील याला अपवाद नाही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत.2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आणि कॉग्रेस हे पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या महायुती तर्फे देण्यात आलेल्या उमेदवारा विरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते.त्या वेळी आघाडी कडून शेकाप तर्फे निवडणूक रिंगणात माजी नगरसेवक हरेश केणी यांना उतरवण्यात आले होते.त्या नुवडणूकीत महायुतीचे उमेदवार भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
या विधानसभा निवडणूकीमध्ये मात्र समीकरणे बदलली आहेत. महायुतीचे उमेदवार आमदार ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले केणी आता महायुती सोबत आहेत तर महायुती सोबत निवडणूक रिगणात उतरलेल्या शिवसेनेची दोन शकले झाली आहेत तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात देखील उभी फूट पडली आहे. अशातच विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष निवडून येण्या योग्य उमेदवार निवडणूक रींगणात उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.भाजपातून उबाठा गटात सामील झालेल्या लीना गरड या देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, शहरी भागात गरड यांची असलेली ताकत पाहता महाविकास आघाडी कडून गरड यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघात शहरी भागातील मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहे. गरड यांनी मालमत्ता करा विरोधात घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे शहरी भागात गरड यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी कडून गरड यांना उमेदवारी देण्यात आल्यास निवडणूक रंगतदार होणार आहे.