Asim Sarode Press Prashant Koratkar sued for defamation by Indrajit Sawant
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यामुळे कोरटकरवर कारवाई सुरु आहे. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. आज जिल्हा न्यायालयाने जामीन अर्जावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. मात्र पुढील सुनावणी नऊ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. इंद्रजीत सावंत यांच्या कडून प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस देण्यात आली आहे. याबाबत ॲड. असीम सरोदे यांनी माहिती दिली आहे.
ॲड. असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची कोरटकरला अब्रू नुकसानी संदर्भात नोटीस बजावली आहे. इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदे यांच्यामार्फत कळंबा कारागृहात नोटीस दिली आहे. कारागृहातील तुरुंग अधिकारी अविनाश भोईर यांच्यामार्फत नोटीस दिली. जामीन अर्जावेळी इंद्रजीत सावंतांनीच छत्रपती शिवरायांची बदनामी केल्याचा कोरटकरांचा उल्लेख आहे. यामुळे अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नुकसानी भरपाईची रक्कम मराठा रेजिमेंटच्या शहीद सैनिकांच्या कुटुंबांना देणार असल्याची माहिती ॲड. असीम सरोदे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अक्षय शिंदे एन्काऊंटरबाबत राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका बसला आहे. यावर ॲड. असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात बेकायदेशीर वागणारे पोलिस अधिकारी, राजकीय नेते यांचे चेहरे सतत समोर येतात. अक्षय शिंदे प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश असतील, तर पोलिस हे सॉफ्ट टार्गेट आहेत. पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेंचा एन्काऊटर करायला लावला, याची माहिती घ्यावी लागेल,” असे मत ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “बदलापूरच्या भिंतींवर ज्या राजकीय नेत्यांचे फोटो लावले होते, त्यांच्यावरही बेकायदेशीर वर्तनासाठी कायद्याच्या कचाट्यात घेण्याचं स्पष्ट मत माझं पहिल्यापासून आहे. ज्यांनी ज्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊटरचं समर्थन केले, ते अत्यंत जुनाट विचारांचे बेकायदेशी डोक्याचे आहेत. कायदा समजून न घेता सत्तेमुळे हुकूमशाही प्रवृत्तीचे ज्या नेत्यांनी अक्षय शिंदेंच्या एन्काऊटरचे राजकारण आणि भांडवल केलं, ज्यांनी महत्त्वाच्या पदावर असताना आम्ही पोलिसांना बंदुका काय खेळण्यासाठी दिल्यात का, असं ज्यांनी म्हटलं त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं सुद्धा माझं मत आहे,” अशी भूमिका ॲड. असीम सरोदे यांनी घेतली आहे.
प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून सब जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. आपल्याला जामीन मिळावा यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मागील चार दिवसात याबाबत सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पुन्हा याबाबत आज सोमवारी सुनावणी झाली. यामध्ये आरोपी व फिर्यादी यांच्या वकीलांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. मात्र याबाबत कुठलाही निर्णय दिला नाही या अर्जावर पुन्हा ९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.