Photo Credit- Social Media कर्जत जामखेड नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल
अहमदनगर: राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्या होमग्राऊंडवरच मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात १७ पैकी १३ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे रोहित पवार गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कर्जत जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
कर्जत नगरपंचायतीत सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे ३ आणि भाजपचे २ नगरसेवक आहेत. पण रविवारी रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील ८ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत नगरपंचायतीतील सत्तांतराची रणनीती आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आज सकाळी उषा राऊत यांच्या विरोधात हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.
रशियाचा हेरगिरीचा नवा डाव; ब्रिटनच्या अणु प्रकल्पाजवळ सापडला पाण्याखालील स्पाय कॅमेरा
राम शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर सोमवारी ( ७ एप्रिल) संबंधित नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले आणि उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करत नगरसेवकांनी त्यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, नागरी सुविधांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आणि अडीच वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा न देणे, या कारणांमुळे नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. “नागरी सुविधांसाठी वेळोवेळी मागण्या करूनही त्या दुर्लक्षित केल्या जातात. टाळाटाळ केली जाते,” असा थेट आरोपही काही नगरसेवकांनी केला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद उफाळून आल्याचे स्पष्ट होत आहे.
कर्जत नगरपंचायतीत दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावामुळे सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या अंतर्गत वाढलेल्या नाराजीचा लाभ घेत भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येत नवे समीकरण उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. या राजकीय हालचालींमुळे कर्जतच्या राजकारणात पुढील काही दिवस तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, आगामी घडामोडींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
UPSC: यूपीएससी क्लिअर न करताच बी. अब्दुल नासर झाले IAS; पहा थक्क करणारी कहाणी
कशी झाली होती कर्जत-जामखेड नगरपंचायत निवडणूक?
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला ३ जागा, तर भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावं लागलं.
या निवडणुकीत सुरुवातीला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे केवळ १३ जागांवर २२ डिसेंबरला मतदान पार पडले. उर्वरित ४ जागांसाठी नंतरच्या टप्प्यात मतदान घेण्यात आलं. यापैकी मागील टप्प्यात भाजपच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे एक जागा बिनविरोध झाली होती. तसेच दुसऱ्या एका भाजप उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यामुळे प्रत्यक्षात ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यात थेट लढत होती. परिणामी संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयामुळे रोहित पवार यांचे स्थान कर्जत-जामखेड मतदारसंघात अधिक बळकट झाले.