Attempts to bring unity and harmony in school period, summer vacation from 2nd May and school will start from 13th June!
अकोला : संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी येत्या २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार असून, २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षात सोमवार १३ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे. या निर्णयानुसार येत्या २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार १२ जून २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार १३ जून रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच, जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार २७ जून २०२२ रोजी सुरू होतील.
इयत्ता पहिली ते नववी व ११ वी चा निकाल ३० एप्रिल २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि तो निकाल विद्यार्थी, पालकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांच्या परवानगीने घेता येईल. तथापि, माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.