
फोटो सौजन्य - Social Media
भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात देवदर्शन घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘एसटी संगे तीर्थटन’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शिर्डीसह राज्यातील प्रमुख धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी दोन ते तीन दिवसांची विशेष टूर पॅकेज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लालपरी सज्ज असून भाविकांना देवदर्शनाचा आनंद देण्यासाठी एसटी महामंडळाने नियोजनबद्ध व्यवस्था उभी केली आहे.
या पॅकेज अंतर्गत साईनगर शिर्डी, श्रीक्षेत्र पंढरपूर, तुळजापूर, माहूर, शेगाव, नाशिक, भीमाशंकर, देवगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, शनि शिंगणापूर यांसह राज्यातील बहुतांश प्रसिद्ध धार्मिक स्थळांसाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकातून या देवदर्शन बसेस सोडण्यात येत असून प्रवाशांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रवास सवलतींचा लाभ दिला जात आहे.
भाविकांनी गटाने बुकिंग केल्यास मागणीनुसार थेट धार्मिक स्थळांसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक गट तसेच इतर संघटनांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. ग्रुप बुकिंगसाठी किमान ४२ प्रवासी असणे आवश्यक असून, गावापासून गावापर्यंत बसची सोय केली जाणार आहे. मात्र, बसस्थानक ते गाव यासाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अकोला आगार क्रमांक २ अंतर्गत देवदर्शन पॅकेज टूरमध्ये अकोला–माहूर फुल तिकीट ३४३ रुपये, हाफ तिकीट १७२ रुपये, अकोला–औंढा नागनाथ फुल तिकीट २६२ रुपये, तर हाफ तिकीट १३१ रुपये इतके ठेवण्यात आले आहे. तसेच पर्यटन स्थळांसाठी अकोला–चिखलदरा फुल तिकीट २३२ रुपये, हाफ तिकीट ११६ रुपये, अकोला–अजिंठा फुल तिकीट २७३ रुपये आणि हाफ तिकीट १३७ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. या दरांमध्ये केवळ प्रवास खर्चाचा समावेश आहे.
एकदिवसीय पॅकेजमध्ये माहूर आणि रामटेकचा समावेश असून, दोन ते तीन दिवसांच्या टूर पॅकेजमध्ये अजिंठा-वेरूळ, घृष्णेश्वर, खुलताबाद, देहू-आळंदी, भीमाशंकर, नाशिक, सप्तश्रृंगी, त्र्यंबकेश्वर, शेगाव, शिर्डी, शनि शिंगणापूर, देवगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजापूर आणि पंढरपूर आदी स्थळांचा समावेश आहे. या उपक्रमात एसटी महामंडळाच्या सर्व सवलती आणि प्रवासी विमा लागू राहणार असल्याचे अकोला मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख सुभाष भिवटे यांनी सांगितले. भाविकांनी आणि विविध गटांनी या देवदर्शन पॅकेजचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.