विजेचा अनावश्यक वापर टाळणे ही आपली जबाबदारी – आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड
प्रामुख्याने विजेचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करणे, ही आपली जबाबदारी असून नागरिकांनी देखील यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कल्याण : विजेचा अनावश्यक वापर टाळणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी आज केले. महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत दि. १४ ते २१ डिसेंबर या दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभाच्या वेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
प्रामुख्याने विजेचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करणे, ही आपली जबाबदारी असून नागरिकांनी देखील यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत बनविण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धन जनजागृतीपर फलकांचे अनावरण आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे इतर अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. विदयुत विभागातील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे व वायरमन पंकज पुंड यांनी आपल्या मधुर आवाजात स्वरचित ऊर्जा संवर्धन गीताचे गायन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले. १४ ते २१ डिसेंबर याकालावधीत असलेल्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे औचित्य साधून या विषयाबाबत ठिकठिकाणी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी दिली.
Web Title: Avoiding unnecessary use of electricity is our responsibility commissioner dr indurani jakhad